वॉशिंग्टन :इलेक्टोरल कॉलेजेसच्या मतदानामध्येही विजय मिळाल्यानंतर बायडेन यांच्या अध्यक्षपदावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. यानंतर त्यांनी डेलावेर राज्यातील आपल्या विल्मिंग्टन गावातून सर्व अमेरिकी नागरिकांचे आभार मानले. हा लोकशाहीचा विजय असल्याचे म्हणत, आपण अमेरिकेच्या एकतेसाठी काम करणार असल्याचे बायडेन यावेळी म्हणाले.
आपला मतदानाचा अधिकार कशा प्रकारे बजावायचा हे अमेरिकी लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे, आणि तेच त्यांनी यावेळी केले. या देशामध्ये लोकशाहीचा दीप कित्येक वर्षांपूर्वी लावला गेला होता, जो अजूनही तेवत आहे. अगदी कोरोना महामारीसारखे जागतिक संकटही हा दिवा विझवू शकले नाही, असे बायडेन यावेळी म्हणाले. कोरोनापुढेही नाही झुकली अमेरिकेची लोकशाही..
जर याआधी कोणाला हे माहित नसेल, तर आता माहित होईल - की अमेरिकेतील लोकांच्या रक्तातच लोकशाही आहे. आपला मतदानाचा अधिकार कशा प्रकारे बजावायचा हे अमेरिकी लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे, आणि तेच त्यांनी यावेळी केले. या देशामध्ये लोकशाहीचा दीप कित्येक वर्षांपूर्वी लावला गेला होता, जो अजूनही तेवत आहे. अगदी कोरोना महामारीसारखे जागतिक संकटही हा दिवा विझवू शकले नाही, असे बायडेन यावेळी म्हणाले.
बायडेन यांना मिळाली ३०६ मतं..
५३८ सदस्यीय इलेक्टोरल कॉलेजमध्ये विजयासाठी २७० हा आकडा गाठणे आवश्यक होते. जो बायडेन यांना एकूण ३०६ मतं मिळाली, तर ट्रम्प यांना केवळ २३२ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे जनतेतून झालेल्या मतदानासोबतच आता इलेक्टोरल कॉलेजच्या मतदानामध्येही ट्रम्प यांचा दारुण पराभव झाला आहे.
ट्रम्प यांनी केला होता भ्रष्टाचाराचा आरोप..
गेल्या महिन्यातच अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यामध्ये बायडेन यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मतमोजणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यासाठी त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. त्यामुळे, कित्येक राज्यांमध्ये पुन्हा मतमोजणी करावी लागली होती.