वॉशिंग्टन डी. सी - डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवरीला शपथ घेणार आहेत. त्याच्या शपथ सोहळ्याकडे जगाचे लक्ष लागले आहे. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर जो बायडन व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करतील. यावेळी त्यांच्या कुटुंबीयासमवेत त्यांचे पाळीव प्राणीही व्हाईट हाऊसमध्ये राहणार आहेत.
जो बायडेन यांचे पाळीव कुत्र्यांवरील प्रेम जगजाहिर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बायडेन आपल्या पाळीव श्वानांसोबतचे फोटो शेअर करत असतात. बायडेन यांच्या श्वानांच्या नावेही एका विक्रमाची नोंद होणार आहे. बायडेन यांचा जर्मन शेपर्ड 'मेजर' हा व्हाईट हाऊसमध्ये जाणारा पहिला रेसक्यू डॉग आहे.
बायडेन यांनी जर्मन शेपर्ड 'मेजर' ला 2018 मध्ये डेलवेयर ह्यूमेन असोसिएशनकडून दत्तक घेतले होते. जर्मन शेपर्ड 'मेजर' हा व्हाईट हाऊसमध्ये जाणार असल्याने तो 'फर्स्ट पेट' म्हणून ओळखला जाणार आहे. 'मेजर' च्या सन्मार्थ डेलवेयर ह्यूमेन असोसिएशन एक व्हर्चअल कार्यक्रम आयोजीत केला होता. यामध्ये श्वान प्रेमींनी सहभाग घेतला. यावेळी अनेकांनी आनंद व्यक्त केला. प्राण्यांना आता त्यांच्या हक्काचा सन्मान मिळत असल्याची प्रतिक्रिया एका व्यक्तीने दिली.
बायडेन यांना श्वानासोबत खेळताना दुखापत -
बायडेन यांच्या जर्मन शेपर्ड 'मेजर' शिवाय एक चँप नावाचे श्वान आहे. 2008 मध्ये बराक ओबामा यांच्या सरकारमध्ये बायडेन उप राष्ट्रपती असताना त्यांच्या पत्नी जिल यांनी त्यांना चँप नावाचा श्वान भेट दिला होता. याचबरोबर त्यांच्याकडे एक मांजर देखील आहे. जो बायडेन यांना डिसेंबरमध्ये मेजर या श्वानासोबत खेळताना दुखापत झाली होती.