वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सत्ता हाती घेताच ट्रम्प यांनी घेतलेल निर्णय बदलण्याचा धडाका लावला आहे. स्थलांतरीत व्यक्तींच्या धोरणाबाबत बायडेन यांनी तीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर ताटातूट झालेल्या कुटुंबीयांची पुन्हा भेट होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 'झिरो टॉलरन्स पॉलिसी' लागू केली होती. ती बदलण्यास बायडेन यांनी सुरुवात केली आहे.
मेक्सिकोमधून अमेरिकेत अवैध प्रवेश -
अमेरिकेच्या दक्षिणेला मेक्सिको हा देश असून तेथून मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या स्थलांतर होते. अनधिकृतरित्या अनेक जण सीमा ओलांडून अमेरिकेत प्रवेश करतात. अनेक ठिकाणी सीमाही निश्चित नाहीत. या प्रश्नावर तोडगा म्हणून ट्रम्प यांनी कठोर नियम लागू केले होते. मात्र, बायडेन यांनी या नियमांना लज्जास्पद आणि नैतिकदृष्या चुकीचे निर्णय म्हटले आहे. कोणत्याही नियोजनाअभावी ट्रम्प यांनी स्थलांतरीतासंबधीची धोरणे लागू केली. यामुळे अनेक मुलांची त्यांच्या पालकांपासून ताटातूट झाली. मात्र, आता त्यांची आता पुन्हा भेट घडवून आणण्यात येईल, असे बायडेन यांनी म्हटले.
मुलांची पालकांपासून ताटातूट -
अवैध प्रवेश रोखण्यासाठी मेक्सिको-अमेरिका सीमेवर एक मोठी संरक्षण भिंत उभारण्यात येत होती. मात्र, बायडेन यांनी सत्तेत येताच पहिल्या दिवशी २० अध्यादेश जारी केले. यातील एका आदेशाद्वारे या भिंतीचे बांधकाम तत्काळ रोखण्यात आले. अमेरिकेत जे अनधिकृतपणे स्थलांतर करून आले आहेत. त्यातील अनेकांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांची लहान मुले यामुळे बेघर झाली असून आता अनेकांच्या पालकांचा काहीही पत्ता नाही. आपले आईवडील कोणत्या तुरुंगात आहेत, याचीही माहितीही मुलांना नाही.