वॉशिंग्टन - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला आहे, असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ( US President Joe Biden on Ukraine-Russia ) शुक्रवारी व्यक्त केला. रशिया-युक्रेन संकटावर व्हाईट हाऊसमध्ये ते बोलत होते. रशियन सैन्याचा आगामी काळात युक्रेनवर हल्ला करण्याचा विचार आहे. आमचा विश्वास आहे की ते युक्रेनची राजधानी कीवला लक्ष्य करतील, असे बायडेन यांनी म्हटलं.
रशियाने युक्रेनवर आणखी आक्रमण केल्यास त्यावर कठोर निर्बंध लादण्यास तयार आहोत. रशिया अजूनही मुत्सद्देगिरी निवडू शकतो. वाटाघाटीच्या टेबलावर परत येण्यास उशीर झालेला नाही, असेही अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले.
रशियाने आपल्या योजनांचा पाठपुरावा केला तर, ते विनाशकारी आणि अनावश्यक युद्धासाठी जबाबदार असतील. अमेरिका युक्रेनमध्ये लढण्यासाठी सैन्य पाठवणार नाही. परंतु, आम्ही युक्रेनच्या जनतेला पाठिंबा देत राहू, असे बायडेन म्हणाले.