वॉटरफोर्ड टाउनशिप- अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार असलेले डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या रिंगणात असलेले जो बिडेन या दोघांकडूनही जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळे हातखंडे वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या कृष्णवर्णीय मतदारांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
मिशीगनमधील कृष्णवर्णियांना साकडे
मिशिगन भागात बहूसंख्येने कृष्णवर्णीय लोकांचे वास्तव्य आहे. याच भागामध्ये शनिवारी जो बिडेन यांच्याकडून जोरदार प्रचार करण्यात आला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत जो बिडेन यांनी या ठिकाणी संयुक्त रॅली काढत मतदारांना मत देण्याचे आवाहन केले. दरम्यान बराक ओबामा हे स्वतः कृष्णवर्णीय असल्याने कृष्णवर्णीय मतदारांवर त्यांचा विशेष प्रभाव आहे. याचा फायदा निवडणुकीत बिडेन यांना होणार असल्याची चर्चा आहे.
प्रचारात बिडेन आघाडीवर
उल्लेखनिय बाब म्हणजे अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या एका सर्वेनुसार जो बिडेन यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अमेरिकास्थित भारतीय लोकांनी देखील जो बिडेन यांच्याच नावाला पसंती दिली आहे. दुसरीकडे ट्र्म्प यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कृष्णवर्णीय लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्याचा फटकाही ट्रम्प यांना बसू शकतो.