वॉशिंग्टन -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महाभियोगादरम्यान त्यांच्याविरोधात साक्ष देणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. लेफ्टनंट कर्नल अलेक्झांडर विंडमन आणि गॉर्डन सोंडलँड अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. विंडमन हे व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे युक्रेनमधील प्रमुख तज्ज्ञ होते. तर, सोंडलँड हे युरोपियन महासंघातील अमेरिकन राजदूत होते.
ट्रम्प यांची महाभियोगाच्या कारवाईतून निर्दोष मुक्तता झाली. त्यांच्या रिपब्लिकन पक्षाची सदस्यसंख्या सिनेटमध्ये जास्त असल्याकारणाने त्यांची मताधिक्याच्या जोरावर महाभियोगातून सुटका झाली. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाने ५२ विरुद्ध ४८ मताधिक्याने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. तसेच, काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून सिनेटने ट्रम्प यांची ५३ विरुद्ध ४७ मतांनी निर्दोष मुक्तता केली. याच्या दोन दिवसांनंतरच त्यांच्याविरुद्ध सिनेटसमोर साक्ष देणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.