वॉशिंग्टन - अलीकडच्या काही महिन्यांत केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, खोकले असता कफाचा थेंब हवेत 2 मीटर प्रति सेकंद वेगाने 6.6 मीटरपर्यंत प्रवास करू शकतो. तर, हाच कफाचा थेंब हवा कोरडी असताना आणखी जास्त अंतरावर प्रवास करू शकतो.
सिंगापूरमधील संशोधकांनी व्हायरल ट्रान्समिशन समजून घेण्यासाठी फ्लुइड फिजिक्सच्या महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यासात समावेश केला. 'फिजिक्स ऑफ फ्लुइड्स' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या प्रबंधामध्ये सिम्युलेशनद्वारे छोट्याशा थेंबाच्या फैलावचा अभ्यास करण्यात आला.
हेही वाचा -अमेरिकेत 8 लाख 50 हजारहून अधिक लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह
'मास्क घालण्याव्यतिरिक्त, आम्हाला सामाजिक अंतर राखणे हादेखील प्रभावी मार्ग असल्याचे आढळले आहे. कारण खोकल्याच्या दरम्यान, एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून छोटासा थेंब उडाल्याने कमीतकमी एक मीटर अंतरावर असलेल्या व्यक्तीवर कमी परिणाम होतो,' असे अभ्यासक, लेखक फोंग येव लेओंग म्हणाले.
एकदा खोकल्यावर तोंडातून मोठ्या प्रमाणात हजारो थेंब बाहेर पडतात. गुरुत्वाकर्षणाच्या बळामुळे वैज्ञानिकांना जमिनीवर मोठे थेंब सापडले. परंतु खोकल्यानंतर वारा वाहत नसतानाही हे थेंब सहजपणे एक मीटरपर्यंत गेले. यात मध्यम आकाराचे थेंब बाष्पीभवनामुळे आणखी लहान थेंबांमध्ये परिवर्तित होतात. जे, हलके झाल्यावर सहजतेने पुढे, इकडे-तिकडे प्रवास करतात, असे या अभ्यासात म्हटले आहे.
'बाष्पीभवन होणाऱ्या छोट्या थेंबांत बाष्पीभवन न होणारे विषाणूजन्य पदार्थ असतात. यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका प्रभावीपणे वाढतो. हे बाष्पीभवन झालेले थेंब एरोसोल्स बनतात आणि ते फुफ्फुसात जास्त खोल जाण्याची शक्यता असते आणि ते अत्यंत क्रियाशीलही असतात,' असे ते पुढे म्हणाले.
हेही वाचा -अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 1 फेब्रुवारीपर्यंत 4 लाखांवर पोहोचण्याचा अंदाज