महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

9/11 : इतिहासातील एका भीषण दहशतवादी हल्ल्याची १९ वर्षे... - अमेरिका काळा दिवस

११ सप्टेंबर ही तारीख केवळ अमेरिकेच्या नव्हे, तर जगाच्या इतिहासातील महत्त्वाची अशी तारीख. १९ वर्षांपूर्वी याच दिवशी अमेरिकेसह जगाला हादरवून सोडणारा एक दहशतवादी हल्ला घडला होता. याचे पडसाद आज इतक्या वर्षांनंतरही दिसून येतात. केवळ १०० मिनिटांच्या कालावधीत घडलेल्या या सर्व प्रकारामध्ये जवळपास तीन हजार लोकांचा जीव गेला होता. जागतिक राजकारणावरही या हल्ल्याचे दूरगामी परिणाम झाले...

9/11, When terror crushed the American defence
9/11 : इतिहासातील भीषण दहशतवादी हल्ल्याची १९ वर्षे...

By

Published : Sep 11, 2020, 8:27 AM IST

Updated : Sep 11, 2020, 9:39 AM IST

हैदराबाद : 19 वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा अतिरेकी हल्ला घडला होता. अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकातील 19 दहशतवाद्यांनी चार प्रवासी विमानांचे अपहरण केले. त्यापैकी 2 विमाने ही अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींवर पाडली गेली, एक विमान अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय पेंटागॉनवर पाडण्यात आले. तर एक विमान पेन्सिल्व्हेनिया राज्यातील शँक्सव्हिले गावाजवळ कोसळले. जवळपास तीन हजार लोकांचा जीव घेतलेले हे चारही हल्ले 100 मिनिटांच्या कालावधीमध्ये घडले होते.

9/11 : इतिहासातील भीषण दहशतवादी हल्ल्याची १९ वर्षे...

हल्ल्याचे बळी...

वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दोन्ही हल्ल्यांमध्ये मिळून२,७५३लोक मारले गेले. पहिल्या हल्ल्यानंतर, आतमध्ये मदतीसाठी गेलेले अग्निशामक दलाचे ३४३ कर्मचारी, २३ पोलीस अधिकारी आणि बंदर प्राधिकरणाचे ३७ अधिकारी, नंतर इमारतीच्या कोसळण्याने मारले गेले. या हल्ल्याच्या बळींमध्ये दोन वर्षांच्या लहानग्यांपासून ८५ वर्षांच्या व्यक्तीपर्यंत सर्वांचा समावेश होता. यांपैकी जवळपास ८० टक्के हे पुरुष होते.

पेंटागॉनमधील हल्ल्यामध्ये१८४लोकांचा बळी गेला. तर, पेन्सिल्व्हेनिया राज्यातील शँक्सव्हिले गावाजवळ कोसळलेल्या विमानातील प्रवासी आणि कर्मचारी मिळून९३लोक मारले गेले. असे मानले जाते, की विमानातील प्रवासी आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या झटापटीमुळे दहशतवाद्यांनी ते विमान नियोजित ठिकाणी न पाडता त्या गावात पाडले.

२०१९ च्या जुलैपर्यंत वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आपला जीव गमावलेल्या लोकांपैकी केवळ ६० टक्के लोकांचीच ओळख पटली आहे.

काय घडले ११ सप्टेंबरला..?

  • 8:46 AM अमेरिकेचे बोस्टनहून लॉस अँजेलिसला येणारे प्रवासी विमान (फ्लाईट-११) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उत्तरी इमारतीवर येऊन आदळले, आणि एकच खळबळ उडाली.
  • 9:03 AM पहिल्या धक्क्यातून लोक अजून सावरलेही नव्हते की, युनायटेड एअरलाईन्सचे बोस्टनहून लॉस अँजेलिसला येणारे दुसरे प्रवासी विमान (फ्लाईट-१७५) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दुसऱ्या- म्हणजेच दक्षिणी इमारतीवर येऊन आदळले.
  • 9:37 AM बलाढ्य अशा अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय असलेली पेंटागॉन इमारतही दहशतवाद्यांनी लक्ष्य करत, वर्जिनियाच्या डेल्लासहून लॉस अँजेलिसला येणारे प्रवासी विमान (फ्लाईट-७७) त्या इमारतीवर आदळले.
  • 9:59 AM वर्ल्ड ट्रेड सेंटरची दक्षिणी इमारत कोसळली.
  • 10:03 AM न्यू-जर्सीच्या नेवार्कहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे युनायटेड एअरलाईन्सचे प्रवासी विमान (फ्लाईट-९३) पेन्सिल्व्हेनिया राज्यातील शँक्सव्हिले गावाजवळ कोसळले.
  • 10:28 AM वर्ल्ड ट्रेड सेंटरची उत्तरी इमारत देखील कोसळली.

हेही वाचा :ट्रम्प निवडणुका हरल्यास ९/११ प्रमाणे हल्ला होईल; ओसामा बिन लादेनच्या पुतणीचा दावा

हल्ल्यानंतर काय घडले..?

  • १३ डिसेंबर २००१ : ओसामा बिन लादेनने एका व्हिडिओमध्ये या हल्ल्याची जबाबदारी घेत असल्याचे सांगितले होते, अमेरिका सरकारने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला.
  • १८ डिसेंबर २००१ : अमेरिकेच्या काँग्रेसने ११ सप्टेंबर हा दिवस 'देशभक्ती दिन' म्हणून घोषित केला.
  • १२ मार्च २००२ : होमलँड सिक्युरिटी विभाग तयार करण्यात आला. यामध्ये कस्टम सर्विस, इमिग्रेशन आणि नॅचरलायझेशन सर्व्हिस, यूएस कोस्ट गार्ड आणि फेडरल इमरजेंसी मॅनेजमेंट एजन्सी यांसह इतर २२ सरकारी संस्था एकत्रित करण्यात आल्या.
  • २६ एप्रिल २०११ : राष्ट्रीय दहशतवाद सल्लागार प्रणाली (एनटीएएस) च्या जागी होमलँड सुरक्षा सल्लागार प्रणाली (एचएसएएस) नेमण्यात आली.
  • २ मे २०११ : अल कायदा या दहशतवादी संघटनेचा अध्यक्ष ओसामा बिन लादेनला अमेरिकी सेनेच्या विशेष पथकाने कंठस्नान घातले.

कसे ठार केले जगातील सर्वात कुप्रसिद्ध दहशतवाद्याला..?

२००१ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काही वर्षे अमेरिका शांत बसली आहे असेच कोणालाही वाटले असते. मात्र, अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा नक्कीच शांत नव्हती. दरम्यानच्या काळात, अमेरिकेला सावरण्यासोबतच बिन लादेनचा शोधही अखंडपणे सुरुच होता. या शोधाला गती मिळाली ती २००७ मध्ये.

२००७ मध्ये बिन लादेनच्या एका विश्वासू हस्तकाची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली. त्याची आणखी माहिती मिळवली असता, २००९ च्या दरम्यान तो पाकिस्तानमध्ये त्याच्या भावासोबत राहत असल्याचे समजले. ऑगस्ट २०१० मध्ये त्याच्या घराचा पत्तादेखील अमेरिकेने मिळवला. अबोटाबादमधील त्याच्या घराची गुप्तपणे पाहणी केली असता, जवळपास ६० ते ७० लाख रुपये किंमतीच्या घरात तो राहत असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाला समजले आणि तिथेच त्यांचा संशय बळावला.

त्याच्यावर आणि त्याच्या घरावर लक्ष ठेवल्यावर गुप्तचर संस्थेच्या लक्षात आले, की आतमध्ये अजूनही कोणी व्यक्ती राहते, जी कधीच बाहेर येत नाही. त्यामुळे सप्टेंबर २०१०मध्ये अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना, ओसामा बिन लादेन या घरामध्ये असू शकतो, अशी माहिती दिली. ओबामा यांनी त्यांना याबद्दल आणखी पुरावे गोळा करण्यास सांगितले. त्यानंतर, फेब्रुवारी २०११ पर्यंत अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने अबोटाबादमधील त्या घरावर पाळत ठेऊन, तिथे ओसामाच राहत असल्याची खात्री करून घेतली.

१४ मार्च २०११ला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीची पहिली बैठक पार पडली. ज्यामध्ये, या घरावर छापा टाकून लादेनला ठार मारण्याच्या योजनेबाबत चर्चा झाली. त्यानंतर, २९ मार्चला दुसरी, १२ एप्रिलला तिसरी, १९ एप्रिलला चौथी आणि २८ एप्रिलला पाचवी आणि शेवटची बैठक झाली. या बैठकीनंतर, २९ एप्रिल २०११ला सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी ओबामांनी लादेनच्या घरावर छापा मारण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, २ मे २०११रोजी पहाटेच्या दरम्यान नेव्ही सील्सच्या २५ जवानांच्या पथकाने, पाकिस्तानच्या अबोटाबादमधील घरावर छापा टाकला. आणि याच छाप्यामध्ये त्यांनी ओसामा बिन लादेनला ठार केले. कोणाला काही समजण्याच्या आधी, त्याच दिवशी अरबी समुद्रातील अमेरिकेच्या कार्ल विन्सन या डेकजवळ, समुद्रतळाशी ओसामा बिन लादेनला पुरण्यात आले. त्याआधी, ओसामाच्या डीएनएची चाचणी करून, मेलेला व्यक्ती ओसामाच असल्याची त्यांनी खात्री करून घेतली.

यानंतर ३ मे २०११ला सीआयएचे संचालक लिऑन पॅनेट्टा यांनी सांगितले, की पाकिस्तानी यंत्रणा ओसामाला कदाचित समर्थन देत होती, किंवा त्यांना ओसामा तिथे असल्याची कल्पनाच नव्हती. या दोन्हींपैकी एकही गोष्ट चांगली नाही.

३ मे २०११ला तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिदने, ओबामांकडे ओसामा बिन लादेनला मारले गेले असल्याचा ठोस पुरावा नसल्याचे जाहीर केले. त्यावर ओबामांनी ४ मे २०११ला ओसामाच्या मृतदेहाची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यास नकार दिला. ६ मे २०११ला मात्र, अल कायदाने स्वतःच ओसामाच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचे मान्य केले.

हेही वाचा :फुटबॉल स्टेडियममध्ये दिसला ओसामा बिन लादेन!

Last Updated : Sep 11, 2020, 9:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details