मेक्सिको सिटी - पश्चिमी मेक्सिकोमधील एका व्हिडिओ गेम आर्केडमध्ये गोळीबार झाला. चार बंदूकधारी व्यक्तींनी केलेल्या या गोळीबारात तीन लहान मुलांसह नऊ जण ठार झाले, तर दोन जण जखमी झाले आहेत. सोमवारी हा हल्ला झाला होता.
यावेळी हल्लेखोर कोणा विशिष्ट व्यक्तीला शोधत होते. मात्र, नंतर त्यांनी सगळीकडे अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यामध्ये १२, १३, आणि १४ वर्षांची तीन लहान मुले, तसेच १७ आणि १८ वर्षांची दोन किशोरवयीन मुले ठार झाली. याआधी शुक्रवारीही काही बंदूकधाऱ्यांनी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांवर गोळीबार केला होता. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता, तर दोन पोलीस जखमी झाले होते.