वॉशिंग्टन -अमेरिकेच्या इलिनॉय राज्यात बॉलिंग अॅली येथे एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला. संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
शिकागोपासून सुमारे 140 किलोमीटरवर रॉकफोर्डमधील बॉलिंग अॅली येथे शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेत 3 लोक जखमीही झाले आहेत, असे वृत्त सिन्हुआने दिले आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, रॉकफोर्डचे पोलीस प्रमुख डॅन ओशिया म्हणाले की, ज्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या, त्यात दोन किशोरवयीन मुलेही होती. जखमींची स्थिती आणि वय अद्याप समजू शकले नाही, तसेच घटनेत ठार झालेल्या लोकांचे वयही समजलेले नाही.