कोलंबिया विद्यापीठाने सोमवारी यावर्षीच्या पुलित्झर पारितोषिकांची घोषणा केली आहे. यामध्ये पत्रकारितेचे १५, आणि साहित्य, नाटक आणि संगीत यामधील सात पुरस्कारांचा समावेश आहे. यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींंमध्ये तीन भारतीय छायाचित्रकारांचा समावेश आहे. चान्नी आनंद, मुख्तार खान आणि दार यासिन यांनी काश्मीरमधील गदारोळ सुरू असताना घेतलेल्या छायाचित्रांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुलित्झर हा पुरस्कार पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. अमेरिकेतील हा एक मोठा पुरस्कार आहे. १९१७मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांचे हे १९१७वे वर्ष आहे. पुलित्झर पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्रासर १५ हजार डॉलर्सचे बक्षीसही देण्यात येते. सार्वजनिक सेवा विभागातील पुरस्कार वगळता इतरांनाच रोख रक्कम पुरस्कारात मिळते. सार्वजनिक सेवा विभागातील पुरस्कार विजेत्याला सुवर्णपदक देण्यात येते.
यावर्षीचे पुरस्कार पुढीलप्रमाणे..
- पत्रकारिता -
१. ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग -या श्रेणीतील पुरस्कार हा लुईसविलेमधील 'द कुरिअर जर्नल' या वृत्तवाहिनीच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. केंचुकी राज्याच्या गव्हर्नर यांनी अखेरच्या क्षणाला मागितलेल्या शेकडो माफीनाम्यांचे सर्वाधिक जलद कव्हरेज केल्याबाबत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
२.शोधपत्रकारिता - 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या ब्रायन एम. रोसेन्थल यांना हा पुरस्कार मिळाला आहे. न्यूयॉर्कमधील टॅक्सी चालकांना आकर्षक कर्जांच्या जाळ्यात अडकवून, त्यांना देशोधडीला लावत सावकार कशाप्रकारे नफा मिळवत आहेत हे त्यांनी उघड केले होते. यामुळे राज्य आणि देशस्तरीय अन्वेषण होऊन, सरकारने व्यापक सुधारणा घडवून आणल्या.
३. स्पष्टीकरणात्मक अहवाल - 'वॉशिंग्टन पोस्ट'च्या संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी हा पुरस्कार घोषित झाला आहे. पृथ्वीवरील तापमानवाढीचा होणारा परिणाम, याबाबत वैज्ञानिक अहवालांसह स्पष्ट माहिती देणारी मालिका त्यांनी चालवली होती. त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
४. स्थानिक वार्तांकन - 'बाल्टिमोर सन' या वृत्तपत्राच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. बाल्टिमोर शहराच्या मेयर आणि शहराची सार्वजनिक रुग्णालय व्यवस्था यांमधील अघोषित संबंध उघड करण्याबाबत त्यांनी केलेल्या वार्तांकनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
५. राष्ट्रीय वार्तांकन- 'प्रो पब्लिका' या वृत्तसंस्थेचे पत्रकार टी ख्रिस्टियन मिलर, मेगन रोज आणि रॉबर्ट फेटुर्ची यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पॅसिफिक महासागरामधील प्राणघातक नौदल अपघातांच्या मालिकेनंतर अमेरिकेच्या 7 व्या फ्लीटच्या त्यांनी केलेल्या शोध आणि वार्तांकनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
यासोबतच, 'द सिएॅटल टाईम्स'चे डॉमिनिक गेट्स, स्वीव मिलेटिच, माईक बेकर आणि लेविस काम्ब यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. दोनवेळा क्रॅश झालेल्या बोईंग ७३७ मॅक्स या प्रकारच्या विमानांच्या डिझाईनमधील त्रुटी, आणि त्याबाबत सरकारचे अपयश दाखवण्यासंबंधी केलेल्या वार्तांकनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
६. आंतरराष्ट्रीय वार्तांकन - 'दि न्यूयॉर्क टाईम्स'च्या संपूर्ण कर्मचारी वर्गाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या राजवटीचा अंदाज उघडकीस आणणार्या विशेष बातम्यांच्या वार्तांकनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अत्यंत धोकादायक अशा परिस्थितीतून कितीतरी गोपनीय गोष्टी त्यांनी उघडकीस आणल्या होत्या.