BRICS परिषद: दहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं १ ट्रिलीयन डॉलरचं नुकसान - पंतप्रधान
दहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं १ ट्रिलियन डॉलरच नुकसान झाले आहे, दहशतवादामुळे व्यापार आणि उद्योगांच मोठं नुकसान झाल्याचे मोदी म्हणाले. ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढत असल्याचे मोदी म्हणाले.
नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी काल(गुरुवार) ब्राझिलिया येथे (गुरुवारी) ब्रिक्स परिषदेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं १ ट्रिलियन डॉलरच नुकसान झाले आहे, दहशतवादामुळे व्यापार आणि उद्योगांच मोठं नुकसान झाल्याचे मोदी म्हणाले. ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
मोदींनी काल ११ व्या ब्रिक्स परिषदेला संबोधित केले. यावेळी ब्रिक्स समुहातील ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांचे अध्यक्ष उपस्थित होते. शांतता, विकास आणि भरभराटीसाठी दहशतवाद मोठा अ़डथळा ठरत आहे. काही विकसीनशिल देशांचे उत्पन्न दहशतवादामुळे १.५ टक्के कमी झाले आहे. मागील दहा वर्षात दहशतवादाने २ लाख २५ हजार लोकांचा बळी घेतला आहे. यामुळे समाज उद्ध्वस्त झाल्याचे मोदी म्हणाले.
दहशतवादाने सगळीकडे संशयाचे वातावरण निर्माण केले आहे. दहशतवादाला पैसा पुरवणं, नशेच्या पदार्थांची तस्करी आणि संघटीत गुन्हेगारीमुळे व्यापार आणि उद्योगांचे अगणित नुकासान होते. दहशतवादाचा मुकाबला कसा करायचा? यावर ब्रिक्स देशांनी चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल मोदींनी समाधान व्यक्त केले. ब्रिक्स देशांच्या प्रयत्नांमुळे दहशतवाद आणि संघटीत गुन्हेगारी समूळ नष्ट होईल, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.
ब्रिक्स देशांतील व्यापार आणि गुंतवणूक वाढीवर मोदींनी भर दिला. ब्रिक्स देशांतील व्यापार फक्त १५ टक्के आहे, तर लोकसंख्या ४० टक्के आहे, त्यामुळे व्यापार वाढला पाहिजे. ब्रिक्स देशांची पुढील १० वर्षांत दिशा काय असायचा हवी? ज्यामुळे सर्वांना मिळून पुढे जाता येईल. काही क्षेत्रांमध्ये यश मिळाले असले तरी, अनेक क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले.
याबरोबरच मोदींनी पाणी बचत आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. शहरी भागामध्ये शाश्वत पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन आणि स्वच्छता ही महत्त्वाची आव्हाने असल्याचे मोदी म्हणाले. ब्रिक्स समुहातील देशांची पाणी व्यवस्थापनाबाबत बैठक आयोजित करण्याची संकल्पना मोदींनी मांडली. 'फिट इंडिया' अभियानामध्ये ब्रिक्स देशांनी सहकार्य वाढवण्याचे आवाहन मोदींनी केले.