नवी दिल्ली - अमेझॉनच्या पर्जन्य वनात लागलेल्या आगीस ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांनी हॉलीवूडचा ऑस्कर विजेता अभिनेता लिओनार्डो दि कॅप्रियोला जबाबदार ठरवले होते. अमेझॉनमध्ये लागलेल्या आगीस कारणीभूत असलेल्या पर्यावरणवादी 'एनजीओ'ला लिओनार्डोने अनुदान दिले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. लिओनार्डोने मात्र या आरोपांचे खंडन केले आहे.
ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोल्सानारो यांनी गुरुवारी एका 'वेबकास्ट'मध्ये अमेझॉन येथील पर्जन्य वनाला लागलेल्या आगीस लिओनार्डो जबाबदार असल्याचे म्हटले होते. बोल्सानारो म्हणाले लिओनार्डो हे अनेक गैर सरकारी संघटनांना अनुदान देतात, त्याच्याद्वारे देण्यात येणारे अनुदानच या आगीस कारणीभूत असल्याचे बोल्सानारो म्हणाले.
लिओनार्डो किती शांत व्यक्ती आहेत, हो ना? मात्र, तोच अमेझॉनमध्ये आग लावणाऱ्यांना अनुदानामार्फत पैसे देतो. याव्यतिरिक्त त्यांनी हिच गोष्ट फेसबुकच्या लाईव्ह प्रसारणाच्या दरम्यानही म्हटली होती. मात्र, त्यांनी लिओनार्डोवर लावलेल्या आरोपांबाबत कुठलेही पुरावे दिले नाहीत.
तर, लिओनार्डोने बोल्सानारो यांनी लावलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. ज्या संस्थेवर आरोप करण्यात येत आहेत, त्या संस्थेला मी अनुदान करत नसल्याचे लिओनार्डो म्हणाला. तसेच 'मी अमेझॉनच्या जंगलाला वाचविणाऱ्या ब्राझीलीयन लोकांना, तेथील आदिवासी समुदायांना, शोधकर्त्यांना, पर्यावरणप्रेमींना, शैक्षणिक संस्थांना, स्थानिक प्रशासनाला मी सहकार्य करत राहणार असल्याचे, त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरून सांगितले.
काय आहे प्रकरण -
काही दिवसांपूर्वी अमेझॉनच्या पर्जन्य वनात आग लागली होती. ही आग जवळपास ३ आठवडे पेटत होती, त्यामुळे जंगलाचा मोठ्या प्रमाणातील भाग जळून खाक झाला आणि खूप नुकसान झाले. यावर हॉलीवूड अभिनेता आणि पर्यावरण प्रेमी असलेल्या लिओनार्डो याने चिंता व्यक्त केली होती. अमेझॉन जंगलाबाबतच्या त्याच्या ट्विटनंतर जगभरातील अनेक प्रतिनिधी, अभिनेते आणि इतर लोकांनी 'पृथ्वीचे फुफ्फुस जळत असल्याचे' म्हणत चिंता व्यक्त केली होती. विशेष म्हणजे अमेझॉन जंगल हे जगातील सर्वात मोठे जंगल म्हणून ओळखले जाते. तसेच ह्या जंगलातून पृथ्वीवरील एकूण ऑक्सिजनच्या 20 टक्के ऑक्सिजन निर्मिती होत असते. त्यामुळे जगभरातून पृथ्वीच्या पर्यावरणावर घातक परिणाम होईल, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या.