ब्राझिलिया - ब्राझील सरकारने कोरोनासंबंधित माहिती आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून हटवली आहे. ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोल्सनारो देशात कोरोनाचा उद्रेक रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत जगभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे ही माहिती हटवली गेली असल्याचे बोलले जात आहे.
ब्राझिलच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारीत्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून कोरोनासंबंधित डेटा हटवला आहे. देशात गेल्या २४ तासांत २७,०७५ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून ९०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १०,२०९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
देशात सध्या काय परिस्थिती आहे, हे या आकड्यांवरून स्पष्ट होत नाही, असे बोल्सनारो यांनी ट्विटरवरून सांगितले. मात्र संकेतस्थळावरून डेटा का हटवला याबद्दल त्यांनी काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. कोरोनाविरोधातील परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती बोल्सनारो यांनी दिली.
सलग चार दिवस १०००पेक्षा जास्त रुग्णांचे मृत्यू झाल्यानंतर संकेतस्थळावरून माहिती हटवण्यात आली. ब्राझिलमध्ये आतापर्यंत ६,४५,७७१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगात कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत ब्राझील दुसर्या क्रमांकावर आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात ब्राझिलमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ होईल.
दरम्यान, गेल्या आठवड्यात ब्राझिलमधील मृतांची संख्या इटलीपेक्षा जास्त झाली आहे. ब्राझिलमध्ये आजअखेर ३५,०२६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.