अबुजा -आफ्रिकेच्या पश्चिमी बाजूला असलेल्या नायजेरियाच्या किनाऱ्यावरून समुद्री चाच्यांनी वीस भारतीयांचे अपहरण केले होते. यामधील १९ लोकांची सुटका करण्यात आली आहे. तर, एका भारतीयाचा चाच्यांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
आफ्रिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावरील समुद्रातून प्रवास करणाऱ्या एम.टी. ड्यूक या जहाजातील २० भारतीयांचे १३ डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. यामधील १९ लोकांची सुखरूप सुटका केल्याबद्दल भारताने नायजेरियाच्या प्रशासनाचे आभार मानले आहेत.
भारत सरकार आणि 'मिशन' यांनी नायजेरियाच्या सरकारसह काम करत २० भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यांपैकी १९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. दुर्दैवाने, चाच्यांच्या ताब्यात असताना प्रतिकूल परिस्थितीमुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला. 'मिशन' हे आता त्या भारतीयांना लवकरात लवकर परत आणण्याचे प्रयत्न करत आहे, अशा आशयाचे ट्विट भारतीय उच्च आयोगाने केले.
अबुजामधील भारतीय आयोगाने नायजेरिया आणि इतर शेजारी राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांसमवेत या बचावकार्यात सहभाग घेतला होता.
हेही वाचा : 'सीएए अन् एनआरसी हे भारताचे अंतर्गत विषय'