तिरुअनंतपुरम - तब्बल 75 दिवसांनंतर केरळमधील शबरीमला मंदिर 14 जूनला अय्यप्पा भक्तांसाठी खुले होणार आहे. येथे केवळ रांगेद्वारे दर्शन घेण्यास परवानगी दिली जाईल. तसेच, सध्याच्या कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल. हे मंदिर ‘मिधुनमासा पूजा’ (मल्याळम दिनदर्शिकेत मिधुनम महिन्यातील मासिक पूजा) आणि मंदिर उत्सवासाठी उघडले जाणार आहे.
केरळमधील मंदिरे, प्रार्थनास्थळे मंगळवारपासून भाविकांसाठी पुन्हा सुरू होणार आहेत. सरकार आणि देवस्वम बोर्डाने शबरीमला अयप्पा मंदिरासारख्या प्रमुख मंदिरात यात्रेकरूंना आगाऊ आरक्षणाच्या माध्यमातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे निर्बंध घालण्याचा आणि अन्य राज्यातील यात्रेकरूंसाठी कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक करण्याचे ठरवले आहे.
एका वेळी जास्तीत जास्त 200 लोकांना मंदिरात दर्शन घेण्याची मुभा असेल. तर, गर्भगृहाजवळ एका वेळी फक्त 50 लोकांना परवानगी दिली जाईल. तसेच, गर्भगृहाच्या आत केवळ 5-5 जणांना गटागटाने दर्शनासाठी सोडण्याचा विचार सुरू आहे. पहाटे 4 ते दुपारी 1 पर्यंत आणि दुपारी 4 ते रात्री 11 अशी दर्शनाची वेळ असेल. केवळ पंबामार्गे मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी असेल. इतर सर्व प्रवेशद्वारे बंद राहतील.