मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली. तसेच हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा देण्यात आली होती. यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस खात्यात महत्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेत या अधिकाऱ्यांची होणार बदली
काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच मध्ये 5 वर्षांहून अधिक काळ काम करत असलेल्या तब्बल 65 पोलीस निरीक्षकांची बदली केली होती. यानंतर आता हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलिसांच्या महत्त्वाच्या शाखेपैकी एक आर्थिक गुन्हे शाखेकडे सुद्धा लक्ष दिले असून या ठिकाणी 4 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत आहे.
नव्या गुन्ह्यांचा तपास घेऊ नये-
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या बदलीच्या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेमध्ये 31 मे 2021 पर्यंत ज्या अधिकाऱ्यांना 4 वर्षे पूर्ण होती, अशा अधिकार्यांची बदली केली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या महत्त्वाच्या विभागात बदली होणाऱ्या अधिकार्यांनी नव्या गुन्ह्यांचा तपास घेऊ नये, असेही आदेश देण्यात आल्याचे मुंबई पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.