मुंबई :पालघर-मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बेजबाबदारपणामुळे कारचा अपघात होऊन प्रसिद्ध उद्योगपती तसेच टाटाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री व जहांगीर पंडोल यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालवत असलेल्या डॉ.अनायता पंडोल आणि त्यांचे पती दारीयस पंडोल हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी वापी येथील रेनबो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( 29 Accident Spots Marked on Mumbai Ahmedabad Highway )
मुंबई-अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला :गेल्या आठ-दहा महिन्यांपासून मुंबई-अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. तसेच, महामार्गावर सूचनाफलक, संपर्क क्रमांक फलक नसल्याने वाहन चालकांना महामार्गावरील त्रुटी समजण्यास अडचणीचे ठरत आहे. सूर्या नदीवर ज्या ठिकाणी काल सायरस मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला, तिथे तीन पदरी रस्ते निमुळते होऊन दोन पदरी होत होते. सदर ठिकाणी याबाबतचा सूचनाफलक नसल्याने भरधाव वेगाने असलेली त्यांची कार नियंत्रणाच्या बाहेर जाऊन डिव्हायडरला जोरदार धडकली, असे सांगितले जाते.
हा महामार्ग आता मृत्यूचा महामार्ग बनलाय :मुंबई-अहमदाबाद महामार्ग अनेक समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. हा महामार्ग आता मृत्यूचा महामार्ग बनत चालला आहे. मनोर ते आच्छाड या 52 किमीच्या मार्गावर दीड वर्षांत 90 पेक्षा जास्त अपघातात 106 जणांचा बळी गेला आहे. तर 49 जण कायमचे अपंग झाले आहेत. मेंढवण, आंबोली, चारोटी उड्डाणपूल परिसर हे अतिधोक्याचे आहेत.
गेल्या पाच वर्षांत या महामार्गावर शेकडो लोकांचा मृत्यू :गेल्या पाच वर्षांत मेंढवन ते अच्छाड रस्त्यावर मेंढवण भागात 421 अपघात झाले असून, यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 289 प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच, चारोटी या ठिकाणीही 302 अपघातामध्ये 32 मृत्यू झाले, तर 285 चालक, प्रवासी जखमी झाले आहेत. धानिवरी या ठिकाणीही 120 अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू, तर 110 जण जखमी झाले आहेत. आंबोली-तलासरी परिसरातसुद्धा 164 अपघातांमध्ये 34 जणांचा मृत्यू व 128 जण जखमी झाले आहेत.
प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा :जिथे अपघात घडला तो मार्ग दोन्ही बाजूंनी तीन पदरी (लेन) आहे. सूर्या नदीवरील पुलावर हा तीन पदरीचा महामार्ग दोन पदरी होतो, त्यामुळे वाहनचालकास त्याचा अंदाज येत नाही व त्यात त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटते व अपघात होतात. त्याच्या बाजूलाच एक पूल बांधण्यात आला आहे. मात्र, तो सेवा रस्ता म्हणून उपयोगात आणला जातो. वेळोवेळी त्या ठिकाणी अपघात होत असतानासुद्धा सुरक्षा विषयक बोर्ड लावणे अपेक्षित असताना तसे बोर्ड कुठेच लावल्याचे दृष्टीस पडत नाही.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी :महामार्गलगत जंगली गवतसुद्धा वाढले असून त्याची कापणीसुद्धा करण्यात आलेली नाही. महामार्ग प्राधिकरणाच्या वेळ काढूपणामुळे तरुण उद्योजक गमवावा लागला असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणी केली जात आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर :भारताचे प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्रीच्या अपघाती मृत्यूनंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई-अहमदाबाद दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. वाहने अतिवेगात असतात. दिल्ली, राजस्थान गुजरात, महाराष्ट्राला जोडणार्या या महामार्गावर हजारो प्रवासी आणि मालवाहू अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते.
हरबनसिंग नन्नाडे यांच्याकडून प्राधिकरणा विरोधात लढा :या हजारो वाहनांकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दरवर्षी टोलच्या माध्यमातून हजारो कोटींची बक्कळ वसुली करूनदेखील महामार्गावर सुरक्षिततेच्या आवश्यक उपाययोजना करीत नसल्यामुळे वारंवार अपघात होऊन दुर्दैवी बळी जात असल्याचे मत हरबनसिंग नन्नाडे यांनी व्यक्त केले आहे. याकरिता मी व माझे सहकारी याबाबत गेली अनेक वर्षांपासून लढा देत असून प्राधिकरण या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे
मुंबई अहमदाबाद महामार्गावर २९ अपघातप्रवण ठिकाणे
महामार्गावरील ब्लॅक स्पॉट :मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शिरसाड फाटा ते अच्छाडपर्यंत २९ अपघातप्रवण ठिकाणे चिन्हांकीत करण्यात आली आहेत. यामध्ये सकवार उड्डाणपूल, ढेकाळे वाघोबा खिंड, वरई फाटा उड्डाणपूल,सातीवली क्रॉसिंग,हालोली गाव,मॅकडोनाल्ड पाटील पाडा,दुर्वेस वैतरणा नदी पूल,मस्तान नाका पूल,जव्हार फाटा क्रॉसिंग, नांदगाव क्रॉसिंग, आवढाणी क्रॉसिंग,मेंढवण खिंड,मेंढवण वळण,सोमटा पूल, तवा गाव क्रॉसिंग,सूर्या नदी पूल,चारोटी फ्लायओवर, एशियन पेट्रोल पंप क्रॉसिंग, महालक्ष्मी मंदीर उड्डाणपूल, धानीवरी गाव, आंबोली वळण, आंबोली क्रॉसिंग, वडोली क्रॉसिंग, सूत्रकार फाटा, सावरोली गाव सारख्या सातत्याने अपघात होत असलेल्या जागांचा समावेश आहे.यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंप आणि हॉटेल चालकांनी स्वत:च्या फायद्यासाठी महामार्गावर अनधिकृत कट आणि क्रॉसिंग तयार केले असून या सर्व गैरप्रकारांविरोधात तक्रारी करून सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस दुर्लक्ष करीत आहेत.
खड्ड्यांमुळे वाताहत :मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदर फाउंटन हॉटेल ते गुजरात सीमेवरील अच्छाड पर्यंत जीवघेणे खड्डे पडल्याने हायवेची अक्षरक्ष वाताहात झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल वसुली करणाऱ्या ठेकेदार कंपनीने हायवेची नियमित देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याने दिवसेंदिवस अपघातात वाढ होऊन नागरिकांचे बळी जात आहेत तर अनेक जण गंभीर जखमी होत आहेत.
अनधिकृत जोडरस्ते :राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर असलेल्या खासगी आस्थापना, हॉटेल्स, रेस्टॉरंट बार, धाबे अशा ठिकाणी अनधिकृत जोडरस्ते मोठ्या प्रमाणात आहेत. हे सर्व विनापरवाना जोडरस्ते बांधून अपघातांना कारणीभूत ठरत आहे. गेल्या सहा-आठ महिन्यांपासून महामार्गाची पार दुरावस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या महाराष्ट्र हद्दीतील घोडबंदर ते तलासरी भागातील महामार्ग पूर्णतः खड्डेमय झाला आहे.
महामार्गावर सोईसुविधांची वानवा :या महामार्गावर अनेक तांत्रिक अडचणी कायम आहेत. सूचना फलक, दिशादर्शक फलक, संपर्क क्रमांक फलक, स्वयंचलित संपर्क यंत्रणा, गस्ती पथक व इतर भौतिक सुविधांची निगडित असलेली महामार्गावरील यंत्रणा पूर्णपणे जर्जर झाली आहे. अपघातवेळी योग्य वेळेत मदत न पोहोचणे, महामार्गावरील वाहने बाजूला काढण्यासाठीची यंत्रणा अशा अनेक समस्या महामार्गावर डोके वर काढत आहेत. प्राधिकरण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या समस्यांकडे जातीने लक्ष देत नसल्यामुळे समस्या वाढतच चालल्या आहेत.
महामार्गावर सोईसुविधांची वानवा :महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय गुजरातमध्ये महामार्ग प्राधिकरणासह अभियांत्रिकी सल्लागार कंपनी व महामार्ग देखभाल दुरुस्ती करणारे ठेकेदार यांच्यामध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे महामार्गाच्या समस्या आजही कायम आहेत. त्यामुळे महामार्ग प्रकल्पाचे प्राधिकरण कार्यालय महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे.
हेही वाचा :बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर; राष्ट्रपती भवनात जोरदार स्वागत