वॉशिंग्टन डी. सी - जगभरात कोरोनाचा कहर सुरु असून अमेरिकेला कोरोनाचा सर्वांत जास्त फटका बसला आहे. यातच अमेरिकेमध्ये येत्या काही दिवसांत अध्यक्षपदाच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांची निवड केली आहे. तर उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांची निवड केली आहे. कमला हँरिस यांची उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. कमला हॅरिस यांचे भारताशी एक खास नाते आहे.
कमला यांचे भारताशी निकटचे नाते...
कमला हॅरिस या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलँडमध्ये झाला असून त्यांच्या आईचा जन्म भारतात झाला होता, तर वडील जमैकन आहेत. कमला हॅरीस यांच्या आई श्यामला गोपालन असून त्या तामिळ वंशाच्या आहेत. श्यामला या नावाजलेल्या कॅन्सर संशोधक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या होत्या. आपल्या मुलांची नाळ भारतासोबत जुळलेली असावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कमला यांचे आई-वडील विभक्त झाल्यानंतर कमला हॅरिस आणि तिची बहीण माया आईकडे राहत होत्या.
'माझ्या आईने माझे आणि माझ्या बहिणेचे संगोपन केले. ती निर्भीड महिला होती. बर्याचदा वेळा लोक तिच्याकडे दुर्लक्ष करीत असत किंवा तिला गंभीरपणे घेत नव्हते किंवा तिच्या भाषा उच्चारणामुळे, तिच्या बुद्धिमत्तेबद्दल गोष्टी गृहीत धरल्या जात. मात्र, प्रत्येक वेळी माझ्या आईने त्यांना चुकीचे सिद्ध केले, असे कमला हॅरिस यांनी प्रचार कार्यक्रमात सांगितले होते.
आजोबांचा प्रभाव...
कमला हॅरीस यांनी आपला लहानपणीचा बराच काळ हा आजोबांसोबत (आईचे वडील) घालवला आहे. उन्हाळी सुट्ट्यामध्ये त्या आपल्या अजोबांसोबत राहत. तेव्हा कमला यांचे आजोबा भारत सरकारमध्ये नोकरीशाह होते. 'माझे आजोबा भारतातील प्रमुख स्वतंत्र सेनानींपैकी एक होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतातील चैन्नईमध्ये राहत होते. तेव्हा दररोज सकाळी आपल्या मित्रांबरोबर ते समुद्र तटावर फिरायला जात. तेव्हा राजकारण, भ्रष्टाचार , न्याय यावर ते चर्चा करत. त्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. त्यामुळे माझ्यात प्रामाणिकपणा आणि सत्यभावना निर्माण झाली', असे कमला हॅरिस यांनी 2009 मध्ये एका प्रचार कार्यक्रमात सांगितले होते.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार...
यावर्षी जानेवारीत कमला हॅरिस यांनी अध्यक्षीय स्पर्धेतून माघार घेतली होती. माझ्याकडे प्रचार सुरू ठेवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे मी निवडणूकीमधून माघार घेत आहे. मात्र, मी सदैव जनतेसाठी लढत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर डेमोक्रेटिक पक्षाकडून अध्यक्षीय निवडणूकीत जो बिडेन यांना उमेदवारी देण्यात आली. जो बिडेन यांनी नुकतंच कमला हँरिस यांची उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषणा केली. अमेरिकन इतिहासातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे.
उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमदेवार म्हणून घोषणा...
अमेरिकेच्या इतिहासात उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. यापूर्वी अमेरिकेत उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी दोन महिलांना उमेदवारी दिली होती. मात्र, डेमोक्रेटिक पक्षाच्या गेराल्डाइन फरेरो (1984) आणि रिपब्लिकन पक्षाच्या सारा पॅलिन (2008) यांचा निवडणुकीत पराभव झाला होता. जर कमला हॅरिस निवडणूक जिंकल्या तर उपराष्ट्राध्यक्ष बनणाऱ्या त्या पहिल्या महिला असणार आहेत. विद्यमान उपाध्यक्ष माइक पेन्स पुन्हा एकदा ट्रम्प यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाकडून उपाध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत.
कमला यांनी हार्वर्ड विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राची पदवी मिळवलेली आहे. 1990 च्या सुमारास कमला हॅरीस यांनी आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेसिनेटमधील अनेक हाय-प्रोफाइल समित्यांवर काम केले आहे. कमला हॅरिस दोन वेळा अॅटर्नी जनरल होत्या. त्यानंतर 2017 साली त्या खासदार म्हणून निवडून गेल्या.
दरम्यान कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या असल्याने अमेरिकेत वास्तव्यास असलेले भारतीय त्यांच्याकडे झुकण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकन काँग्रेसमध्ये पाच इंडो-अमेरिकन आहेत. यामध्ये राजा कृष्णामूर्ती, प्रमिला जयपाल, रो खन्ना, अमी बेरा आणि राजा कृष्णमूर्ती आणि सिनेटमध्ये कमला हॅरिस यांचा समावेश आहे. यापैकी केवळ कृष्णमृर्ती हे ह्यूस्टन येथील एनआरजी स्टेडियममध्ये मोदींचा 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. इतरांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती.
काश्मीरी नागरिक हे एकटे नसून त्यांच्यासोबत संपूर्ण जग आहे. आम्ही संपूर्ण परिस्थितीचा मागोवा घेत आहोत. गरज भासल्यास हस्तक्षेपही करू, असे कमला हॅरिस म्हणाल्या होत्या. दरम्यान, अमेरिका-भारत संबंध ही एक व्यापक आधारभूत रणनीतिक भागीदारी आहे. जर जो बिडेन यांनी निवडणूक जिंकली. तर कमला हॅरिस, मोदी सरकारसोबत कसे जुळवून घेतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.