न्यूयॉर्क- येत्या काही वर्षांत भारत आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये १.३ ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तसेच देशाच्या सामाजिक पायाभूत सुविधांवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात आहेत, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममध्ये आपल्या मुख्य भाषणात त्यांनी हे सांगितले.
भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे लक्ष्य सध्या भारतासमोर आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारताकडे पुरेसे धाडस, क्षमता आणि परिस्थितीदेखील आहे. लोकशाही, लोकसंख्याशास्त्र, मागणी आणि निर्णायकपणा हे चार घटक आहेत, जे भारताला अद्वितीय आणि गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह बनवतात. तुम्हाला जर जगातील सर्वात मोठ्या शहरीकरणात आणि सर्वात जास्त पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही नक्कीच भारतात या.
तुमच्या इच्छा आणि आमची स्वप्ने उत्तम प्रकारे जुळतात. तुमचे तंत्रज्ञान आणि आमचे कौशल्य जग बदलू शकते. तुमचे स्केल आणि आमची कौशल्ये ही जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतात. तुमची विवेकपूर्ण पद्धत आणि आमचे व्यावहारिक विचार मिळून व्यवस्थापनात नवे आयाम उघडू शकतात. तुमचे तर्कशुद्ध मार्ग आणि आमची मानवी मूल्ये जगाचा मार्ग शोधू शकतात आणि हे सर्व होत असताना कोठेही कसलाही दुरावा निर्माण झाला, तर मी नक्कीच वैयक्तीकरित्या दोन्हीमधला दुवा म्हणून काम करेल, असे म्हणत मोदी यांनी आपल्या भाषणातून परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
भारताने सध्या एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी आणली आहे. यावर्षी २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीला संपूर्ण देशामध्ये 'सिंगल यूज प्लास्टिक' विरोधात मोहीम राबवली जाणार आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : स्वच्छ भारत अभियानासाठी पंतप्रधान मोदी 'ग्लोबल गोलकिपर' पुरस्काराने सन्मानित