सांगली- पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचे घटक पक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपावरची असलेली नाराजी जाहीर केली. भाजपाला सोडचिठ्ठी देऊन वेगळा घरोबा करण्याचा पवित्रा खोत यांनी घेतला आहे. इस्लामपूरमध्ये पत्रकार परीषद घेत खोत यांनी भाजपाचे शत्रू व त्यांचे एकेकाळचे सहकारी राजू शेट्टी यांच्या सोबत पुन्हा नव्याने घरोबा करण्याचे संकेत दिले आहेत. राजू शेट्टी यांनी लुटारुंची संगत सोडल्यास त्यांना खांद्यावर घ्यायला आपण तयार आहोत, अशी साद सदाभाऊ खोत यांनी शेट्टींना घातली आहे.
तर राजू शेट्टींना पुन्हा खांद्यावर घेऊ; सदाभाऊ खोतांचा भाजपाला इशारा.. - स्वाभिमानी शेतकरी संघटना
भाजपचा सहयोगी पक्ष आणि रयतक्रांती शेतकरी संघटनेचे नेते माजी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत भाजपवर नाराज आहेत. खोत यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा देण्याचा पावित्रा घेत राजू शेट्टी यांच्या सोबत जाण्याचे संकेत दिले आहेत.
खोत यावेळी म्हणाले, यंदाच्या ऊस हंगामाच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेने उसाला एकरकमी एफआरपी द्यावा, तसेच केंद्राने साखरेल 3 रुपये अधिक दर द्यावा, ज्यामुळे शेतकरयांना 200 रुपये अधिक मिळतील ,ही भूमिका स्पष्ट केली होती. तर राजू शेट्टींनी त्यांच्या ऊस परिषद मध्येही हीच मागणी करण्यात आली होती. त्यामुळे शेट्टी आणि इतर शेतकरी संघटना व आमचे रस्ते जरी वेगवेगळे असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आमचे ध्येय आणि विचार एकच आहेत.
तर शेट्टींना पुन्हा खांद्यावर घेऊ-
त्यामुळे राजकारणात कोणीही एकमेकांचा कायमचा शत्रूही आणि मित्रही नसतो,आणि शेतकऱ्यांंच्या प्रश्नांवरती राजू शेट्टी, आमची भूमिका योग्य असतील तर भविष्यात शेतकऱ्यांसाठी आम्ही एकत्र येऊ, असे संकेत खोत यांनी दिले आहेत. आज राजू शेट्टी आणि माझ्यात जी दरी आहे. ती राजकीय पटलावर कोणाची बाजू घ्यायची यावरून निर्माण झाली आहे. पण राजू शेट्टींनी प्रस्थापितांची संगत सोडून जर विस्थापितांची बाजू घेत, साखर सम्राटांच्या विरोधात सर्व सामान्यांच्या बाजूने लढा हातात घेतल्यास सदाभाऊ खोत शेट्टींना पुन्हा खांद्यावर घ्यायला तयार आहे, अशी साद खोत यांनी शेट्टींना घातली आहे.
शेतकरी हिताचीच आपली भूमिका-
भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राज्यात जे लढे होतील, त्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या हिताचे असेल ती भूमिका आपणा घेऊ, अशी भूमिकाही खोत यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे खोत यांनी भाजपाला अप्रत्यक्ष इशारा सुद्धा यानिमित्ताने दिला आहे.
समाधान न झाल्यास मैत्री पूर्ण लढत-
पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये रयत क्रांती संघटनेने आपला उमेदवार उभा केला आहे. भाजपाकडून आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आपली बैठक पार पडणार आहे. मात्र यामध्ये समाधानकारक चर्चा न झाल्यास मैत्री पूर्ण लढत होईल, अशी भूमिकाही यावेळी खोत यांनी जाहीर केली आहे.
भाजपावर दबाव तंत्राची नीती?
गेल्या काही दिवसांपासून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपावर नाराज आहेत, मात्र त्यांची नाराज काय आहे,हे अद्याप समोर आले नाही. पण ज्या पद्धतीने सदाभाऊ खोत हे राजू शेट्टींशी पुन्हा हात मिळवणी करण्याची जी भाषा करत आहेत, ती भाजपावर दबाव तंत्र टाकण्याची असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.