नवी दिल्ली - केंद्रातील भाजप सरकार राम मंदिर शिलान्यास कार्यक्रमाची जोरदार तयारी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. ही घटना देशासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला राम मंदिर आंदोलनाचे प्रणेते लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्यासह वरिष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांना सरकारने आतापर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण दिलेले नाही.
एका बाजूला सरकारकडून भव्य राम मंदिर बांधण्यासाठी शिलान्यास कार्यक्रमासाठी अयोध्येत भव्य तयारी केली जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना अद्याप या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालेले नाही.
संपूर्ण आयुष्यभर राम मंदिर आंदोलनाचे राजकारण करणारे भाजपचे वरिष्ठ नेते आणि भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले लालकृष्ण आडवाणी यांना आतापर्यंत भाजपने राम मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमाविषयी विचारलेले नाही. आडवाणी यांच्या जवळच्या आणि त्यांच्या कामकाजाची देखभाल करणाऱ्या एका अधिकाऱ्याने बोलताना ही माहिती दिली. सरकारव्यतिरिक्त इतर कोणत्या संस्थेकडूनही अद्याप आडवाणी यांना कोणतेही निमंत्रण मिळाले नाही.
अशाच प्रकारे भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्याशी संपर्क केला असता, अद्याप त्यांना या समारंभात सहभागी होण्यासाठी पत्र मिळाले नसल्याने त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही, असे उत्तर मिळाले.
या दोन प्रमुख नेत्यांसह अनेकांनी भारतीय जनता पक्षाचा पाया रचला होता. राम मंदिर आंदोलन आणि रथयात्रा या दोन बाबी लाल कृष्ण अडवाणी यांच्या राजनैतिक कार्यकाळातील सर्वात मोठे यश मानले जाते. याचा परिणाम आतापर्यंत पहायला मिळत आहे. यापैकी, अयोध्येमध्ये राममंदिर बनण्याचा रस्ता मोकळा होणे, ही बाबही समाविष्ट आहे.
भाजपचे वयोवृद्ध नेते अडवाणी यांनी राम मंदिर निर्माण व्हावे, यासाठी संपूर्ण देशभरात रथयात्रा काढली होती. त्यामुळे त्या वेळच्या सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला होता. तसेच, त्यांची रथयात्रा पूर्ण होण्याआधीच सरकारने त्यांना अटकही केली होती. बाबरी मशीद पाडण्यातही या नेत्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. यामुळे या नेत्यांवर खटले दाखल झाले आहेत. आताही वेळोवेळी त्यांना खटल्यांना उपस्थित राहावे लागते. नुकतेच आडवाणी आणि डॉ. जोशी यांनी न्यायालयासमोर आपापले जबाब नोंदवले होते.
दरम्यान, भाजपचे वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी यांनी न्यायालयासमोर उपस्थित राहण्यापूर्वी एक दिवस आधी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट घेतली होती. सध्या आडवाणी, जोशी या दोघांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की, अद्याप त्यांना शिलान्यास कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालेले नाही. अशा परिस्थितीत त्यांनी कार्यक्रमात सहभागी होणे शक्यच नाही.
राम मंदिर ट्रस्टतर्फे सर्व सामान्य लोकांना भक्तांनी अयोध्येत न येता दूरदर्शन या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करणार आहे; त्याचा घरी बसूनच आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, या ठिकाणी मीडिया उपस्थित राहणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश सरकारने एक अॅडव्हायजरी जारी करून मीडियाला राम मंदिराच्या प्रस्तावित यांच्यापासून बरेचसे दूर ठेवण्याची व्यवस्था केली आहे आणि त्याच्या प्रक्षेपणाची जबाबदारी मात्र केवळ सरकारी वाहिन्यांकडे सोपवण्यात आली आहे.
या कार्यक्रमावेळी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार मधील प्रमुख लोक प्रमुख मंत्री या ठिकाणी उपस्थित राहतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.