मुंबई - लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून कर्तव्य पार पडत आहेत. पण कोरोनाशी लढणाऱ्या खाकी वर्दीतील अनेक योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्य पोलीस दलात गेल्या 48 तासांत 3 कोरोनाग्रस्त पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा 48 वर गेला आहे.
राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत 1 हजार 16 कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 116 पोलीस अधिकारी तर 900 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 2 पोलीस अधिकारी व 46 पोलीस कर्मचारी अशा 48 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईच्या 32 पोलिसांचा समावेश आहे.
लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188नुसार तब्बल 1 लाख 33 हजार 730 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबई वगळता क्वारंटाइचा नियम मोडणाऱ्या 740 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 277 घटना घडल्या असून या प्रकरणी आतापर्यंत 858 जणांना अटक करण्यात आलेली आहे.