मुंबई - श्रावण महिना लागला आहे आणि रक्षाबंधन चा सण जवळ आलाय. गेली दोन वर्षे आभासी पद्धतीने साजरा करावा लागलेला हा सण यावर्षी धूमधामीत साजरा होणार हे नक्की. श्रावण महिन्याचे हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. श्रावण महिना म्हटल की अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजाविधी यांची रेलचेल असते त्यात सगळयांचा लाडका सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाची वाट आपण सगळेच बघत असतो. याच बरोबर येते संतती रक्षणार्थ केली जाणारी जिवतीची पूजा,या पूजेचे महत्व देखील काही खास आहे. लवकरच योगयोगेश्वर जय शंकर मालिकेमध्ये जिवतीची पूजा आणि रक्षाबंधन विशेष भाग बघायला मिळणार आहे.
योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत जिवतीची पूजा याचे महात्म्य देखील गोष्टी रूपात सांगितले जाणार आहे. याचसाठी मालिकेत एक विशेष एंट्री होणार आहे. कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेत रमा बनून मराठी मनावर जिने अधिराज्य गाजवले, सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातून जिने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले अशी सगळयांची लाडकी सृष्टी पगारे या मालिकेत पावनीची महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.