मुंबई- यावर्षी लॉकडाऊनच्या कचाट्यातून बाहेर पडल्यावर चित्रपट प्रदर्शनांची रीघ लागली. हिंदी चित्रपट पटापट रिलीज होऊ लागले आणि धडाधड कोसळूही लागले. हिंदी चित्रपटांची वाताहत होत होती तरीही बऱ्याच मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम धंदा केला. त्यातील एक नाव म्हणजे ‘पावनखिंड’. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना यातून अनुभवायला मिळाला. आता नुकत्याच सुरु झालेल्या प्रवाह पिक्चरवर ‘पावनखिंड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या १९ जूनला होणार आहे.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुटुंबाने एकत्र येण्याचे प्रसंग फार कमी वेळा जुळून येतात. सिनेमा हे एक असं जादुई माध्यम आहे जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतं. यानिमित्ताने आठवणींना उजळा मिळतो आणि नकळत चेहऱ्यावर हास्याची आणि समाधानाची लकेर उमटते. संपूर्ण कुटुंबाचा बंध अधिकाधिक घट्ट करण्यासाठी असे क्षण आयुष्यात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच साध्य करण्यासाठी प्रवाह पिक्चर ही नवी वाहिनी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दर रविवारी नव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. पावनखिंड सिनेमापासून या धमादेकार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची सुरुवात होणार आहे.