मुंबई - अभिनेता सोनू सूद त्याच्या कलाकारीसाठी ओळखला जातोच परंतु त्याची सामाजिक कार्येदेखील लोकांना भावतात. सोनूच्या समाजकार्याची दखल घेतली गेली कोरोना महामारीमुळे लादलेल्या लॉकडाऊनमध्ये. त्या काळात अचानक लागलेल्या लॉकडाऊन मुळे अनेक रोजंदारीवर काम करणारे गरीब कामगार कामाच्या ठिकाणी अडकून पडले होते. काम बंद आणि हातावर पोट असणाऱ्या त्या कामगारांची इथे आड तिथे विहीर अशी अवस्था झाली होती. उपासमारीची वेळ आली होती आणि लॉकडाऊन उठण्याचे नाव घेत नव्हता. घरापासून दूर आलेल्या मोठ्या शहरांत या कामगारांना काय करावे सुचत नव्हते. त्यांनी एक निर्णय घेतला की ट्रेन, बस सर्वच प्रकारची प्रवास साधनं बंद असल्यामुळे, आपापल्या गावी पायी जायचे. हजारो मैल चालत जाण्याच्या त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासन जागे झाले परंतु ते जास्त काही करू शकले नाहीत. त्यावेळी सोनू सूद पुढे आला आणि त्याने या कामगारांसाठी बसेस ची सोय केली आणि जास्तीत जास्त लोकांना आपापल्या गावी धाडले. त्या सुमारास सोनू सूदच्या या कृतीमुळे हजारो लोकांचा फायदा झाला. सोनू ला भरभरून आशीर्वाद मिळाले आणि त्यातील अनेकजण आजही त्याची स्तुती करताना थकत नाहीत. तेव्हा सोनू सूदने एक ट्रस्ट बनविला आणि त्यामार्फत तो आजही गरजूंची मदत करीत आहे.
वंचित मुलांसाठी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना - प्राथमिक शिक्षण अथवा चांगले शिक्षण पुढची पिढी बनवायचे काम करतो. आता सोनू सूदने त्यादृष्टीने पाऊल टाकले आहे. बिहार हे बरेच मागासलेले राज्य आहे असे समजले जाते आणि त्यामुळे तेथील लोकं बाहेरील राज्यात रोजगारासाठी जात असतात. त्या राज्यातील लहान मुलांना, प्रामुख्याने गरीब मुलांना, चांगलं शिक्षण मिळावं या प्रयत्नात सोनू आहे. त्यामुळेच वंचित मुलांसाठी त्याने ‘सोनू सूद इंटरनॅशनल स्कूल’ ची स्थापना करण्याचे योजिले आहे. त्याचं झालं असं की सोनू ने या वर्षी फेब्रुवारी च्या आसपास बिहार प्रशासनातील एक अभियंता बिरेंद्र कुमार महातो यांच्याबद्दल ऐकलं. अवघ्या २७व्या वर्षी या इंजिनियर ने आपली सुखाची, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि एक शाळा सुरु केली, अनाथांसाठी, आणि त्याचे नाव ठेवले सोनू सूद शाळा. त्यांच्यासाठी तो पूर्णवेळ मेहनत करीत होता आणि ११० विध्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि जेवण देत होता. सोनू ला जेव्हा त्याच्याबद्दल समजले तेव्हा त्याने त्याची भेट घेऊन त्यामागची भूमिका जाणून घेतली. बिहार मध्ये गरीब आणि सुखवस्तू समाजातील मुलांच्या शिक्षणात बरीच तफावत आहे, खूप मोठी दरी आहे. तेव्हा सोनू सूद ने ठरविले की शाळा उघडूया आणि त्याच्या शाळेचे काम सुरु झाले आहे आणि त्यात फक्त समाजातील वंचित मुलांना प्रवेश प्राथमिकतेनं मिळणार आहे. तसेच तो सर्व मुलांच्या जेवणाची सोय सुद्धा करणार आहे. एकही मुलगा किंवा मुलगी भुकी राहता कामा नये असे त्याने तिथल्या व्यवस्थापनाला निक्षून सांगितले आहे. तसेच शाळेतील मुलांच्या गरजा समजून घेण्यासाठी त्याने त्यांच्याशी संवाद साधला.
उपेक्षित मुलांसाठी सोनू सूदचे पाऊल- रेशनपासून दर्जेदार शिक्षणापर्यंत समाजातील जागरूक घटकांना प्रेरित करण्यासाठी, तसेच त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी सोनू प्रयत्नशील असून त्याचा उद्देश श्रीमंत आणि गरीब यांच्यातील शैक्षणिक दरी कमी करण्याचा आहे. त्याच्या शाळेत विध्यार्थ्यांना मोफत निवास करता येणार असून शाळेत प्रत्येक मुलासाठी जेवण उपलब्ध होईल याची खात्री घेतली जाणार आहे. या उपक्रमाबद्दल सोनू सूद म्हणाला, 'शिक्षण हे गरिबी हटविण्याचे साधन आहे. त्यामुळे मुलांना शिक्षण देण्याचा आमचा हा उपक्रम सामाजिक दुफळी कमी करू शकेल. आपल्या समाजात उपेक्षित मुलांकडे लक्ष दिले जात नाही त्यामुळे त्यातील अनेक शिक्षणाविना राहतात. शिक्षण वंचितेमुळे ती मुलं गैरमार्गही अवलंबू शकतात. शिक्षणाने रोजगार, नोकरी मिळण्याच्या संधी वाढतात आणि उच्च शिक्षणाने अधिक. त्यामुळे आम्ही उच्चशिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करीत आहोत. तसेच त्यांचे संगोपन आणि विकास योग्यप्रकारे होईल याकडे आमचे लक्ष असेल.' आतापर्यंत देशभरातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी एकट्या सोनू सूदने उचललेली आहे.