मुंबई - Indian Police Force : अभिनेता विवेक ओबेरॉय आगामी शेट्टी दिग्दर्शित 'इंडियन पोलीस फोर्स' या वेब सीरिजमध्ये पोलिसाची भूमिका साकारत आहे. त्याने कामाचा अनुभव शेअर करताना सांगितले की, त्याच्या वाट्याला आलेली भूमिका त्यानं आजवर साकारलेल्या भूमिकाहून पूर्ण वेगळी आहे. यामध्ये तो विक्रम बक्षी ही व्यक्तीरेखा करत आहे. तो खूप धैर्यवान, साहसी आणि आपल्या टीमला कुटुंब मानणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी आहे.
"मला वाटतं मी पहिल्यांदाच दिल्ली पोलीस कर्मचार्याची भूमिका साकारत आहे. यापूर्वी मी साकारलेल्या पोलिसांच्या भूमिकांपेक्षा विक्रम बक्षी कसा वेगळा आहे? तर तो एक संपूर्ण कौटुंबिक माणूस आहे. तो त्याच्या कनिष्ठ टीम सदस्यांनाही त्याचे कुटुंब मानतो. तो खूप मोठ्या मनाचा आणि उत्साही व्यक्ती आहे. आजवर मी अनेक दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. पण, मी ज्यांच्यासोबत काम केले आहे त्यापैकी रोहित शेट्टी एक सर्वात सपोर्टिव्ह माणूस आहे. मला वाटते की मी त्याला 20-21 वर्षांपासून ओळखतो...," असे विवेक ओबेरॉयनं एएनआयशी बोलताना सांगितलं.
"रोहित शेट्टी हा फिल्म इंडस्ट्रीचा विक्रम बक्षी आहे. तो त्याच्या टीमसाठी काहीही करायला तयार असतो. मी त्याला 20-21 वर्षांपासून ओळखतो. आम्ही 'कंपनी'चे शूटिंग करत असताना, अजय (देवगण) भाईने रोहित शेट्टीला फोन केला आणि त्याला सांगितले की एक मुलगा आहे, जो चांगला अभिनेता आहे. तो म्हणाला, 'मी त्याच्यासोबत 'कंपनी' चित्रपट करत आहे, त्याला भेटा. त्यावेळी रोहित भाई मला सेटवर भेटायला आला होता.
विक्रम बक्षीच्या भूमिकेसाठी त्याला कसे कास्ट करण्यात आले, याची आठवण सांगताना तो म्हणाला, "रोहित शेट्टी जेव्हा या भूमिकेचा विचार करत होता तेव्हा त्याच्या मनात माझे नाव होते." रोहित शेट्टीनं पोलीस अधिकाऱ्यांचे ऑनस्क्रीन चित्रण बदलून टाकले आहे. रुपेरी पडद्यावर पोलिसांची प्रतिमा भ्रष्ट आणि गुन्हेगारी स्थळावर नेहमी उशिरा येणारे अशी बनली होती. ती बदलून प्रतिमा शूर आणि समर्पित पोलीस अशी बदलण्याचं काम त्यानं केल्याचंही विवेकनं सांगितलं.
शूटिंगदरम्यान, दिग्दर्शक रोहित शेट्टीनं त्याची कशी स्तुती केली याबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, "दुसरा किंवा तिसरा दिवस असेल आणि मी एका कठीण सीनचे शूटिंग करत होतो. ते पूर्ण झाल्यानंतर, यात काही सुधारणा आवश्यक आहे की, काही बदल करायचे आहेत हे जाणून घेण्यासाठी मी त्याच्याकडे पाहिले. मला आश्चर्य वाटले, त्याने माईक घेतला आणि समोर येऊन संपूर्ण टीमसमोर त्यानं माझ्या कामाचं कौतुक केलं. शेवटी तो म्हणाला की, तुमचे रोहित शेट्टी पिक्चर्समध्ये रेशनकार्ड कनफर्म झालं आहे. तो काय म्हणतोय हे न कळाल्यामुळे मी गोंधळलो होतो. नंतर त्यानं जर अभिनेता उत्तम असेल आणि आमच्या टीममध्ये जर तो चांगला मिसळला तर तो रोहित शेट्टी पिक्चर्सचा भाग बनतो."