मुंबई- सुप्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला कोठारेचं तब्बल १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक होत असून ती स्टार प्रवाहच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. स्वराच्या आईच्या भूमिकेत ऊर्मिला कोठारे दिसत असून स्वर म्हणजेच अवनी तायवाडे सोबत तिचे सुंदर बॉण्डिंग झालेले आहे. त्यामुळे या मालिकेतील त्यांचे सीन्स खूपच रंगतात.
पडद्यावरच्या या मायलेकी, म्हणजेच वैदेही आणि स्वरा म्हणजेच उर्मिला कोठारे आणि अवनी तायवाडे, खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या मायलेकी झाल्या आहेत. उर्मिला आपल्या लेकीप्रमाणेच म्हणजेच जिजाप्रमाणे स्वराची काळजी घेते. इतक्या लहान वयातही स्वरामध्ये असलेला समजूतदारपणा उर्मिलाला विशेष भावतो. दोघींमधली हीच भन्नाट केमिस्ट्री मालिकेत नवे रंग भरत आहे.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना ऊर्मिला म्हणाली, ‘खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहसोबत आणि अर्थातच स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांच्यासोबत खूप जुनं नातं आहे. वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येतेय. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे.’