महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 5, 2023, 5:19 PM IST

ETV Bharat / entertainment

प्रशांत दामले, वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर यांना झी नाट्यगौरव तर्फे मानवंदना

यंदाचा नामांकित झी गौरव सोहळा खास असणार आहे. रंगभूमीवर अनेक दशके सेवा करणाऱ्या दिग्गजांचा गौरव या कार्यक्रमात होणार आहे. प्रशांत दामले, वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर यांना खास मानवंदना देण्यात येणार आहे.

Etv Bharat
झी नाट्यगौरव तर्फे मानवंदना

मुंबई - चित्रपट, मालिका आणि आता ओटीटी सारख्या मनोरंजन सृष्टीतील आव्हानांना मराठी रंगभूमी नेहमीच यशस्वीपणे तोंड देत आली आहे. खरंतर, नाटक म्हणजे मराठी प्रेक्षकांना प्राणप्रिय आणि म्हणूनच मराठी रंगभूमी तग धरून आहे. हल्ली तरुणाईसुद्धा नाटकांना गर्दी करताना दिसते. रंगभूमीवर काम केल्यावर अभिनय धारदार होतो असं म्हटलं जात. सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत कार्यरत असलेले जवळपास सर्वच कलाकार रंगभूमीवरून आलेले आहेत. ज्यांना ती संधी मिळाली नाही ते यशस्वी कलाकार सुद्धा रंगभूमीवर काम करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात. अर्थतच इतके महत्व असलेल्या रंगभूमीला आणि तेथे काम करीत असलेले कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे कौतुक व्हावयालाच हवे. ती जबादारी उचलली आहे झी ने आणि दरवर्षी झी नाट्यगौरव तर्फे हा कौतुक सोहळा पार पडतो. यावर्षी रंगभूमीची दीर्घकाळ सेवा करणाऱ्या प्रशांत दामले, वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर यांना खास मानवंदना देण्यात येणार आहे.

रंगभूमीवरील प्रतिभावंतांचा गौरव - प्रशांत दामले हे गेली अनेक वर्षे इमानेइतबारे रंगभूमीवर नाटकं करीत असून प्रेक्षकांना मनोरंजित करीत आहेत. त्यांनी हल्लीच एका मोठ्या विक्रमला गवसणी घातली. त्यांनी तब्बल १२५०० नाट्यप्रयोग सादर केले असून त्यांची घोडदौड अजूनही सुरूच आहे. विक्रमवीर प्रशांत दामले यांना झी नाट्यगौरव तर्फे मानवंदना देण्यात येणार आहे. नाट्यक्षेत्रातही जीवनगौरव पुरस्कार दिला जातो आणि यावर्षी जेष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना झी मराठी नाट्यगौरव २०२३ जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला आहे. रंगभूमीची अविरत सेवा करणारा अजून एक जेष्ठ आणि श्रेष्ठ कलावंत म्हणजे दिलीप प्रभावळकर. दिलीप प्रभावळकर यांना झी मराठी नाट्यगौरव २०२३ मध्ये विशेष रंगभूमी योगदान पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

झी नाट्यगौरव 2023

वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार - जीवनगौरव पुरस्कार मिळत असलेल्या अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना मोहित केले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ‘पद्मश्री धुंडीराज’ या नाटकातून वंदना गुप्ते यांनी रंगभूमीवर पाय ठेवला. त्यांचा हा प्रवास आजही सुरु असून त्यांच्या नाट्यवेडाला सलाम केला जातो. चारचौघी मधील त्यांच्या ‘टेलिफोन सीन’ ची अजूनही चर्चा होते. अखेरचा सवाल, झुंज, रंग उमलत्या मनाचे, वाडा चिरेबंदी, सुंदर मी होणार सारख्या अनेक नाटकांतून त्यांनी सशक्त भूमिका साकारल्या. या सोहळ्यात ‘चारचौघी’ या नवीन संचात सुरु असलेल्या नाटकातील ‘तो’ प्रसिद्ध प्रवेश मुक्ता बर्वे सादर करणार आहे. ही वंदना गुप्ते यांना खास मानवंदना असणार आहे. वंदना गुप्ते या, कदाचित, पहिल्या अभिनेत्री ठरतील ज्यांना रंगभूमीवर कार्यरत असताना जीवनगौरव पुरस्कार मिळतोय.

नाटकांचाही होणार गौरव - झी नाट्यगौरव अजूनही रंगारंग करण्यासाठी ‘अश्रूंची झाली फुले' ह्या नाटकातील प्रवेश सादर केला जाणार असून त्यात शैलेंद्र दातार, उमेश जगताप आणि सुबोध भावे यांचा सहभाग असेल. ‘यदा कदाचित' या नाटकाला २५ वर्षे होताहेत आणि त्या नाटकातील एक प्रवेश देखील याप्रसंगी पेश केला जाणार असून त्यात कमलाकर सातपुते, आशिष पवार, शलाका पवार आणि संजय खापरे हे कलाकार या नाटकाची सिल्वर ज्युबिली साजरी करतील. अजून एक सिल्वर ज्युबिली वर्ष साजरं करणारं नाटक म्हणजे सही रे सही. आपल्या विनोदी अभिनयाचे रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते भरत जाधव त्यातील एक प्रवेश सादर करतील. तसेच प्रशांत दामले आणि कविता (लाड) मेढेकर यांच्या ‘मन्या आणि मनी’ ची धमाल मस्ती देखील प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२३’ चे लेखन लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचे असून हा सोहळा ९ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना झी मराठीवर पाहता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details