महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"चित्रपटात मला हास्य अभिनेता म्हणून घेण्यास हरकत नसावी" - देवेंद्र फडणवीस - एकनाथ शिंदे

मी बनवलेल्या रील्सवर लोकांनी मिम्स बनवले आहेत. त्यामुळे मला हास्य अभिनेता म्हणून घ्याला हरकत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिश्कीलपणे म्हणाले. एका पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या फडणवीस यांच्यासोबत रितेश देशमुखनंही गप्पा मारल्या.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 12:58 PM IST

मुंबई - एका मराठी वृत्त वाहिनीच्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास हजेरी लावली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही पुरस्कारांचं वितरण केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील पुरस्कार वितरणात भाग घेतला. त्याप्रसंगी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी जबरदस्त चौफेर फटकेबाजी केली.

"हल्ली बघावं तिथे टीव्हीवाल्यांचे कॅमेरे दिसतात. कुठेही लपायची सोय उरलेली नाही. तसं बघायला गेलं तर हल्ली प्रेक्षक राजकारणातील बातम्या बघून त्रासला आहे, वैतागला आहे. त्याला मनोरंजन हवं असतं आणि मनोरंजनसृष्टीतील घडामोडी पाहून त्याला विरंगुळा मिळतो. त्यामुळे न्यूज वाहिन्यांनी ७५ % वेळ मनोरंजनाला द्यावा. नाही म्हणायला काही राजकारणी 'मनोरंजन' करतात. मनोरंजनसृष्टीने आम्हा राजकारण्यांना संधी द्यायला हरकत नाही. आता माझंच बघाना. मी काही रील्स बनविले होते परंतु त्यावर अनेक मिम्स तयार करण्यात आले. त्यामुळे चित्रपटात मला हास्य अभिनेता म्हणून घेण्यास हरकत नसावी." (हशा)

ते पुढे म्हणाले की, "मराठी मनोरंजनसृष्टी प्रगल्भ आहे. मराठी नाटकांनी रंगमंच जिवंत ठेवला. त्यामुळे त्याचे व्यवस्थित संगोपन व्हायला हवं. इथे रितेश देशमुख उपस्थित आहेत. त्यांनी त्यांच्या वडिलांचा प्रांत म्हणजे राजकारण न निवडता मनोरंजन क्षेत्र निवडलं आणि त्यात नाव कमावलं. (हसत) रितेशजी तुम्ही राजकारणात यायचं नाही हं......आणि यायचंच झालं तर कुठून यायचं हे मी सांगेन." (हशा)

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांना 'वेड' या चित्रपटासाठी बेस्ट जोडीचा पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार स्वीकारताना रितेश म्हणाले की, "हा मला आणि जिनिलिया ला मिळालेला पुरस्कार नक्की कशासाठी आहे? चित्रपटासाठी की रील्स साठी? (प्रचंड हशा). जिनिलियाचा हा पहिला मराठी चित्रपट. याआधी तिनं हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या ५ भाषांमधून काम केलेलं आहे. तिला मराठी चित्रपटात काम कारण्याची इच्छा होती ती 'वेड' मुळे पूर्ण झाली. आम्ही करियरला एकत्र सुरुवात केली आणि जिनिलिया माझी फेवरेट को-स्टार आहे. प्रेक्षकांनी आमच्या जोडीला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद."

ABOUT THE AUTHOR

...view details