मुंबई - भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित 'द रेल्वे मेन' ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या या थरारक अनुभव देणाऱ्या मालिकेचा टीझर रिलीज करण्यात आलाय. या मालिकेतून 1984 च्या भोपाळ गॅस दुर्घटनेच्या वेदनादायक घटनांचा शोध घेण्यात आलाय. के के मेनन, आर माधवन, दिव्येंदु शर्मा आणि बाबिल खान यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका चार एपिसोडची असेल. भोपाळ वायू दुर्घटनेत शेकडो निरपराध लोकांना वाचवणाऱ्या आणि कधीही प्रसिद्धी न मिळालेल्या नायकांना ही मालिका वाहण्यात आलीय.
नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया हँडल्सवर शेअर केलेल्या या टीझरमध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेदरम्यान लोकांना बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चार नायकांच्या जीवनाची झलक दिसते. जगातील सर्वात वाईट इंडस्ट्रीयल दुर्घटना मानल्या गेलेल्या भोपाळ वायू दुर्घटनेवर आधारित 'द रेल्वे मेन' ही आकर्षक थ्रिलर मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे.
टीझरच्या सुरुवातीला एका कारखान्यात सुरू झालेली एक भयंकर वायू गळती दिसते. याच्या परिणामी अराजकता आणि विनाशाला आमंत्रण मिळते. ही गळती रोखण्यासाठी आर माधवन, बाबिल खान, के के मेनन आणि दिव्येंदू हे आपल्या प्राणाची बाजी लावताना दिसतात. हानीकारक वायूपासून स्वतःचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असलेल्या लोकांसोबत ही कथा उलगडते आणि भोपाळ रेल्वे स्थानक सरकारच्या नकाशावरून गायब झाल्याचा व्हॉईसओव्हर अंगावर शहारे आणतो.
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाच्या भूमिकेत असलेला आर माधवन स्टेशन मास्तर के के मेनन यांना कारवाई करण्याची विनंती करतो. दिव्येंदूने एका पोलिस हवालदाराची भूमिका साकारली आहे . तो लोकांना त्याच्या गणवेशापेक्षा त्याच्यावर अधिक विश्वास ठेवण्याचे आश्वासन देतो. बाबिल खान लोको पायलट म्हणून टीझरमध्ये दिसतो.