मुंबई - Tunisha Sharma suicide case :'अलिबाबा - दास्ता ए काबूल' या गाजलेल्या टीव्ही मालिकेतील कलाकार तुनिषा शर्मा हिनं 2022 मध्ये पालघर जवळ शूटिंगच्या सेटवरच आत्महत्या केली होती. या संदर्भात तिचा प्रियकर शिझान खाननं त्याच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला आहे.
टीव्ही मालिकेच्या चित्रकरण दरम्यान केली आत्महत्या- टीव्ही कलाकार तुनीषा शर्मा हिचे डिसेंबर 2022 काळात ' अलिबाबा - दास्ता ए काबूल' या टीव्ही मालिकेचं शूटिंग पालघर जिल्ह्यात सेट लावलेल्या ठिकाणी सुरू होते. परंतु त्या दरम्यान 24 डिसेंबर 2022 रोजी तिनं आत्महत्या केली. अत्यंत कमी वयात तिने इतके टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे तिच्या आत्महत्या नंतर मुद्दा अत्यंत संवेदनशील झाला होता. तिच्या आत्महत्येसाठी जबाबदार तिचा प्रियकर शिझान याच्यावर आरोप करण्यात आला आणि त्याला पालघर पोलिसांनी अटक देखील केली.
तुनिषाच्या आईचा आरोप, पोलिसात तक्रार- 24 डिसेंबर 2022 रोजी पालघर या ठिकाणी टीव्हीच्या मालिकेसाठी सेटवर काम करत असताना तिने एकांतात जाऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्ये नंतर सर्वांची शंका तिचा प्रियकर शिझान याच्याकडे वळाली. त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यानं सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. तुनीषाची आई वनिता शर्मा यांनी देखील तसा आरोप केला होता. माझ्या मुलीच्या आत्महत्येस शिझान जबाबदार असल्याचं आईनं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं. त्यामुळे पालघर पोलिसांनी अखेर प्रियकर शिझान याच्यावर गुन्हा दाखल केला होता.