मुंबई - तमन्ना भाटियाने बरीच वर्षे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजविली आणि आता तिने पुन्हा एकदा बॉलीवूडवर फोकस करण्याचे ठरविले आहे असे दिसते. सध्या तिचे हिंदीतील अनेक प्रोजेक्ट्स प्रदर्शित झाले आणि त्यांना प्रेक्षकांचा पाठिंबाही मिळाला. गेल्या वर्षी मधुर भांडारकर दिग्दर्शित बबली बाऊंसरमधून तिने वेगळ्या ढंगाची भूमिका साकारली होती आणि ती प्रेक्षकांना आवडलीही होती. यावर्षी तिची प्रमुख भूमिका असलेली हिंदी वेब सिरीज, जी करदा, प्रदर्शित झाली. लहानपणापासून एकत्र असलेल्या सात मित्र मैत्रिणींची ही कथा तरुणाईला खूप भावली.
'जी करदा'ला तमन्नाच्या अद्वितीय कलाकारीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तिच्या भूमिकेला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम व प्रशंसा मिळाली. तमन्ना भाटिया मुंबईतील आरडी नॅशनल कॉलेजमध्ये शिकलेली असून तिच्या 'जी करदा'चे यश साजरे करण्यासाठी या कॉलेजने एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिथे पोहोचल्यावर तिच्या कामाबद्दल कौतुक देखील झाले. तसेच विद्यार्थ्यांच्या उत्साही वातावरणात तिला आपल्या जुन्या कॉलेज दिवसांची आठवण आली. तमन्ना म्हणाली की, ' 'जी करदा' साठी मला मिळालेले प्रेम आणि कौतुक पाहून मी खूप भारावून गेले आहे. मला हे यश माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत साजरे करायचे होते. अविश्वसनीयरित्या मिळालेला त्यांचा पाठिंबा हुरूप वाढविणारा आहे. या सुंदर अनुभवासाठी मी सगळ्यांचे आभार मानते.'
तसेच तमन्ना भाटियाने नुकताच वेदा नावाचा एक नवीन चित्रपट साईन केला असून तिची जोडी जमणार आहे हँडसम हंक जॉन अब्राहम सोबत. जॉन या चित्रपटाची निर्मिती करीत असून निखिल अडवाणी याचे दिग्दर्शन करणार आहे. ती आणि तिचा बॉयफ्रेंड विजय वर्मा यांची भूमिका असलेली एक कथा 'लस्ट स्टोरीज २' या अंथोलोजीमध्ये समाविष्ट असून त्यालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तमन्ना भाटिया तमिळमध्ये 'थलैवा'मध्ये रजनीकांत आणि भोला शंकरसोबत, तेलुगुमध्ये 'मेगास्टार' चिरंजीवीसोबत जेलरमध्ये झळकणार असून ती मल्याळममध्ये 'बांद्रा', तमिळमध्ये 'अरनमनाई ४' आणि ‘वेदा' या हिंदी चित्रपटामध्ये जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे.