त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांची श्रावणमासी हर्षमानसी ही निसर्ग कविता सगळ्यांनीच लहानपणापासून ऐकली आहे. मात्र आता श्रावण महिना सुरू झाल्याच्या निमित्ताने सागरिका म्युझिकने ही कविता नव्या रुपात, नव्या चालीत सादर केली आहे. गायक स्वप्नील बांदोडकरने नव्या रुपातलं श्रावणमासी हर्षमानसी हे गाणें गायलं आहे. नुकताच या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.
सागरिका म्यूझिकने स्वप्नील बांदोडकरचा ती हा नवा अल्बम सादर केला आहे. या अल्बममधील कसा चंद्र आणि सौरी ही गाणी यापूर्वीच लोकप्रिय झाली असून, त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ५ लाखाहून जास्त हिट्स मिळाले आहेत. नव्या रुपातल्या श्रावणमासीला निलेश मोहरीरनं संगीत दिलं आहे, तर कलांगणच्या बालकलाकारांनी कोरस दिला आहे.
श्रावण महिन्याती ऊन पावसाच्या खेळाचं आणि निसर्गाचं अचूक वर्णन करणारी श्रावणमासी ही कविता आबालवृद्धांच्या अगदी ओठावर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र, नीलेश मोहरीरचं फ्रेश संगीत आणि स्वप्नील बांदोडकरचा अप्रतिम आवाज यांच्या मिलाफातून नवं श्रावणनासी साकारलं आहे. या अप्रतिम गाण्याला देखण्या निसर्गाचीही जोड मिळाली आहे.
स्वप्नील बांदोडकर आणि सागरिका यांचं नातं जुनं आहे. स्वप्नीलनं सागरिकाबरोबर केलेला ती हा पाचवा अल्बम असून याआधी बेधूंद, तू माझा किनारा, तुला पाहिले हे हिट अल्बम स्वप्नील आणि सागरिका यांनी रसिकांना दिले आहेत. त्यातील राधा ही बावरी, गालावर खळी, राधा राधा, मंद मंद अशी गाणी सुपरहिट झाली आहेत. त्यामुळेच आता नव्या रुपातलं श्रावणमासी हर्षमानसी हे गाणंही रसिकांच्या पसंतीला उतरेल यात शंका नाही.