मुंबई- अभिनेत्री सुरुची अडारकरची प्रमुख भूमिका असलेली का रे दुरावा ही मालिका खूप गाजली होती. त्यानंतर सुरुचीने मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकांमधून काम केले. आता ती पुन्हा मराठी मालिकेकडे वळली असून ती ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यात सुरुची अनु देसाई नामक एका शिक्षिकेच्या भूमिकेत ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं' पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. मालिकेतील बयोला शिक्षणाचे खूप वेड असून तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न आहे. परंतु परिस्थिती आणि इतर कारणांमुळे तिचे हे स्वप्न पूर्ण होईल की नाही याची शाश्वती नाहीये. त्यामुळेच शिक्षिका अनू देसाईच्या येण्याने बयोच्या आयुष्यात आशेचा किरण दिसणार असून तिच्या आयुष्यात काय बदल होतील हे मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अनु देसाई आणि बयो यांच्यातील बंध ‘का रे दुरावा’ न म्हणता ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं' पूर्ण करण्यासाठी झटणार आहेत.
‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत बयोची शिक्षणासाठीची जिद्द आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाची ओढ प्रेक्षकांना अनुभवायला मिळत असून त्यांना तिचा शिक्षण प्रवास सुद्धा दिसत आहे. बयो भरपूर अभ्यास करून आपलं डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेत असताना तिची आई, भारती, तिला खंबीरपणे साथ देत होती. तसेच शुभंकरच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले होते. परंतु आता शुभंकर नसणार असून आरतीच्या जाण्याने बयोवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परंतु अनू टीचर च्या येण्याने ती थोडी सावरताना दिसेल. टीचर स्टुडंट नात्यातील मालिकेतून नवे कंगोरे दिसतील असे निर्मात्यांनी सांगितले.
शिक्षणाचे महत्व, खासकरून ग्रामीण भागातील मुलांसाठी, अधोरेखित करणाऱ्या या मालिकेतून अनेकांना प्रेरणा मिळतेय असे दिग्दर्शकाने सांगितले. त्यामुळेच अनेक अडथळ्यांचा सामना करीत शिक्षण घेणारी बयो अनेकांचे प्रेरणास्थान बनेल असेही त्याने नमूद केले. आपल्या देशात अजूनही शिक्षणाप्रती जागरूकता निर्माण झालेली नाहीये. शिक्षण ही मूलभूत गरज असून ते मिळण्याचा सर्वांना हक्क आहे. परंतु शासनदरबारी यावर फारसे काही केले जात नाही आणि आर्थिक परिस्थितींमुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. खरंतर जो देश शैक्षणिक जबाबदाऱ्या ओळखतो तो प्रगत देश असतो आणि आपल्या देशाबद्दल तसे, आत्तातरी, बोलता येणार नाही. असो.
सुरुचीच्या चाहत्यांसाठी ही एक खुशखबर असून ते तिला छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहण्यासाठी आतुर आहेत. ही महत्वपूर्ण भूमिका साकारताना माझ्या अनुभवांच्या शिदोरीत भर पडणार आहे असा विश्वास सुरुची अडारकर ने व्यक्त केला. सुरुची पहिल्यांदाच शिक्षिकेची भूमिका वठवत असून या मालिकेतील तिच्या पेहरावांचीही चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' ही मालिका सोनी मराठीवर प्रसारित होते.