टीव्हीवरील वादग्रस्त शो अशी ज्याची ओळख आहे तो मराठी बिग बॉसचा चौथा सिझन रंगतदार बनत चाललाय. बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या नित्य नव्या घटना, भांडणे आणि टास्कसाठीची चढाओढ पाहायला मिळत आहे. यंदाच्या या सिझनचेही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचा सिझन हा ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. बिग बॉसच्या चौथ्या पर्वात आतापर्यंत दोन सदस्य घराबाहेर पडले आहेत. त्यानंतर आता बिग बॉसच्या घरात आता पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. नुकताच याचा एक प्रोमो प्रसारित झाला आहे.
बिग बॉस मराठीच्या या शोमध्ये सध्या किरण माने, अमृता धोंगडे. अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत, प्रसाद जवादे, त्रिशूल मराठे, यशश्री मसूरकर, योगेश जाधव हे कलाकार सातत्याने चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरात एकूण १६ स्पर्धक दाखल झाले होते. त्यानंतर अभिनेता निखिल राजेशिर्केला व अभिनेत्री मेघा घाडगे आतापर्यंत घराबाहेर पडले आहेत. आता या शोची रंजकता वाढवण्यासाठी पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे.