आजकाल मोठ्यांप्रमाणेच लहान मुलेही ‘सुपरस्टार’ बनण्याची स्वप्नं बघू लागली आहेत. साहजिकच छोट्या पडद्यावर त्यांची ही स्वप्ने पूर्ण होताना दिसताहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ च्या महाअंतिम फेरीत शुद्धी कदम महाविजेती ठरली आणि तिचं सुपरस्टार होण्याचं स्वप्न साकार झालं. विजेती शुद्धी कदमला चार लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना शुद्धी कदम भावूक झाली होती. हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना तिने व्यक्त केली. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी शुद्धीने बरीच मेहनत घेतली होती.
स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. राजयोग धुरी, शुद्धी कदम, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली टाक या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत ठाण्याच्या शुद्धी कदमने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेते ठरले सार्थक शिंदे आणि राजयोग धुरी. सायली ठाक ठरली तृतीय क्रमांकाची मानकरी, तर सिद्धांत मोदी आणि राधिका पवारला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं.