मुंबई- सध्या वेब सिरीजचा जमाना आलाय. आता खूप मोठ्या प्रमाणात वेब सिरीजची निर्मिती होतेय आणि ती हिट ठरली की त्याचा पुढील सिझन येतो. मराठीतही मोजक्याच का होईना पण वेब सिरीज बनताहेत आणि प्रेक्षकांचा पाठिंबाही मिळवताहेत. साधारण दोनेक वर्षांपूर्वी शांतीत क्रांती नावाची मराठी वेब सिरीज आली होती आणि त्यातील तीन मित्र, प्रसन्न, दिनार आणि श्रेयस, अनुक्रमे ललित प्रभाकर, अलोक राजवडे आणि अभय महाजन, यांच्या रोड ट्रिप वर आधारित असलेली ही सिरीज खूप गाजली होती. अर्थातच त्याचा दुसरा सिझन येणे अपेक्षित होते आणि तो येतोही आहे, शांतीत क्रांती सीझन २ या शीर्षकाखाली.
कधी-कधी आपल्याला आयुष्यात काही गोष्टी नीट होण्यासाठी जवळच्या मित्रांसोबत एखाद्या रोड ट्रिपची गरज असते. 'शांतीत क्रांती' या वेब सिरीज च्या पहिल्या भागात तीन बेस्ट फ्रेंड्स, श्रेयस, प्रसन्न आणि दिनार, मैत्री, प्रवास आणि स्वतःचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्या आयुष्यातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गोव्याला केलेल्या रोड ट्रिपची ती गोष्ट होती. नात्यातील असुरक्षिततता, आयुष्यातील अशाश्वतेमुळे भिरभिर झालेली अवस्था, बेफिकिरीमुळे अपूर्ण राहिलेली स्वप्ने असल्या समस्यांचा मुकाबला करताना हे त्रिकुट दिसून आले होते. परंतु त्याची हाताळणी नर्मविनोदी पद्धतीने केलेली असल्यामुळे प्रेक्षकांना ती भावली. शांतीत क्रांती सीझन २ सुद्धा तेच करेल असे निर्मात्यांना वाटते.
लोकप्रिय त्रिकूट, प्रसन्न, दिनार व श्रेयस यांचे 'शांतीत क्रांती सीझन २' मध्ये परदेशी प्रयाण होणार असून या ट्रीपमधील आश्चर्यकारक अनुभव, हास्याच्या उकळ्या फुटणारे क्षण, विनोदी संवाद आणि मॉडर्न रॅप संगीत यांच्यामुळे हा शो नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल असे दिग्दर्शक सांगतो. श्रेयसच्या लग्नासाठी ते इंटरनॅशनल बॅचलर ट्रिपवर जाण्याचे ठरवतात आणि त्यातून हास्य, ट्विस्ट्स, रोमांचने भरलेल्या नवीन प्रवासाची कहाणी प्रेक्षकांना बघायला मिळेल.