रात्रीस खेळ चाले या मालिकेतील ऑल इन वन साळगावकर ही व्यक्तीरेखा साकारणऱ्या दीपक बाबाजी कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही शूट कधी सुरू होणार याबद्दल खात्रीशीर उत्तर दिले नाही. मग आम्ही या साळगावकर अर्थात दीपक कदम यांच्याशी गप्पा मारल्या. तसे हे कदम तळ कोकणातल्या देवगड जवळच्या आरे गावातले. कोकणात भजनाची मोठी परंपरा आहे. पखवाज वादनात तरबेज असलेल्या दीपक यांनी नाट्यवेडामुळे बीएससी होताच नाट्य शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठ गाठले. नाट्यशास्त्राची पदवी मिळताच काही काळ त्यानी टीव्ही चॅनेलमध्ये कामही केले. मात्र रंगभूमीच्या वेडापायी त्यांनी मुंबई गाठली आणि खडतर संघर्ष करुन नाटकाच्या मुख्य प्रवाहात स्वतःला सिध्द केले. कदम यांनी 'लोचा झाला रे' या नाटकाचे त्यांनी ५५० प्रयोग केलेत. इतकेच नाही तर 'अलबत्या गलबत्या' नाटकाचे आतापर्यंत ४७५ प्रयोग झाले आहेत. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, काय बाई सांगू, घालीन लोटांगण, रात्रं दिन आम्हा, काय डेंजर वारा सुटलाय, सारे प्रवासी घडीचे, केशवा माधवा, ड्राय डे, पळा पळा कोण पुढे पळे तो, टाइम प्लीज, देहभान, अंधारात मठ्ठ काळा बैल, दर्शन, भरणी भरपाई (हिंदी - मुआवझे) , रिक्षावाले मामा, जमेल तसं, संन्यस्त खड्ग, आयला होरे, जिंकूया दाही दिशा, सारंगा तेरी याद में यासारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये दीपक यांनी भूमिका साकारल्या आहेत. कदम हे मराठी रंगभूमीवर गेली 20 वर्ष नट म्हणून कार्यरत आहेत. समांतर रंगभूमीपासून सुरवात करून, गेल्या वीस वर्षात आता पर्यंत समांतर आणि व्यवसायिक रंगभूमीवर मिळून एकूण 23 नाटक केली ज्याचे त्यांनी साधारण पणे 1500 च्या वर नाट्य प्रयोग केले.
झी मराठी वरील " रात्रीस खेळ चाले " च्या तिसऱ्या पर्वात त्यांची ऑल इन वन साळगावकर ही भूमिका प्रेक्षकांना आवडतेय. हा अनुभव कसा होता? याबद्दल दीपक म्हणाले, ''मला इथं वेगळा अभिनय करावा लागत नाही. ही मालिका माझ्या भाषेतली आहे. यातील पात्रे मी लहानपणापासून अवती भोवती पाहात आलोय. त्यामुळे दिग्दर्शक राजू सावंत जसा प्रसंग मला देतात तसा मी करतो.''
'रात्रीस खेळ चाले' ही मालिका कशी मिळाली? असे विचारले असता दीपक कदम म्हणाले, ''अर्थात ऑडिशनमधून. आमचे निर्माते सुनिल भोसले यांनी माझी रितसर ऑडिशन घेतली आणि माझी निवड झाली. मी कोकणी असल्याचाही विचार झाला असावा.''
रंगभूमीवर दीर्घकाळ वावरणाऱ्या दीपक कदम यांना आम्ही संस्मरणीय प्रसंग विचारला. यावर दीपक म्हणाले की १९९९ मध्ये आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत जिल्हा पातळीवर कौशल्य दाखवल्यानंतर महाविद्यालयासाठी विद्यापीठ पातळीवर पारितोषिक मिळवून दिलं. तो प्रसंग आजही अंगावर काटा आणणारा आहे. लोकगीताचे सादरीकरण करताना संबळ वाजवण्याचा तो प्रसंग होता. संबळावर पडलेल्या पहिल्या काठी पासून शेवटच्या ठेक्या पर्यंत प्रेक्षकातून संपूर्ण गाण्याला टाळ्या वाजवून गाण्याच्या ठेक्याचा ताल पकडून ते गाणं मुलांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. त्यावेळी आदेश बांदेकर कल्चरल को ऑर्डीनेटर होते. त्यांनी बॅकस्टेजला येऊन विचारले की तू संबळ नेहमी वाजवतोस का? मी पखवाज वाजवतो पण संबळ पहिल्यांदा वाजवली हे ऐकताच ते चकित झाले होते. ती सगळी त्या वाद्याची आणि त्या लोककलेची किमया होती.