मुंबई - बिग बॉस ऑटीटीचा दुसरा सिझन आता अखेरच्या टप्प्यात पोहोचलाय. प्रत्येक भाग काही तरी रंजक घटनांचे दर्शन घडवत आहे. घरात उरलेले स्पर्धकही बेरकी आणि मुरलेले बनले आहेत. प्रत्येकाला आता या स्पर्धेत कसे टिकून राहायचे आणि इतरांवर कुरघोडी कशी करायची याचा चांगलाच अंदाज आला आहे. दोनच आठवड्यावर फिनाले आल्यामुळे स्पर्धकांचे दडपणही वाढताना दिसत आहे. पुढील भागामध्ये अभिनेत्री पूजा भट्ट बिग बॉसची सह स्पर्धक आशिका भाटियाची शाळा घेताना दिसणार आहे. साफसफाईच्या कारणावरुन पूजाने आशिकाला चांगलेच झापले आहे.
बिग बॉस ओटीटीच्या निर्मात्यांनी शेअर केलेल्या प्रोमोच्या झलकमध्ये पूजा आणि आशिका स्वयंपाकघरात साफ करण्यावरून वाद घालताना दिसत आहेत. पूजाने आशिकावर तिची ठरलेली कामे नीट पार पाडली नाही आणि चुकीची वृत्ती बाळगून असल्याबद्दल सुनावले. ती चिडून आशिकाला म्हणाली की, 'आता फार झाले, हात झटकून पुन्हा कामाला सुरूवात कर.'
आशिकाने बिग बॉस ओटीटी २ च्या घरात यूट्यूबर एल्वीस यादवसोबत वाइल्डकार्ड एंट्रीच्या माध्यामातून प्रवेश केला होता. खरंतर उशीरा पोहोचल्यानंतरही ती या घरात आपली हुकुमत गाजवण्यात कमी पडताना दिसते. आशिकाने यापूर्वी अविनाश सचदेव आणि आता बेदखल केलेल्या फलक नाझसोबत भांडताना पाहिले आहे.
रविवारच्या वीकेंड का वार भागादरम्यान, या आठवड्यात बाहेर काढण्यासाठी नामांकित झालेल्यांपैकी एकाचा बिग बॉस ओटीटी 2 चा प्रवास संपेल. सलमान खानने होस्ट केलेल हा लोकप्रिय शो १७ जूनपासून सुरू झाला आहे. हा शो मूळात सहा आठवड्यांचा ठरला होता. मात्र जिओ सिनेमावर याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी याचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवला आहे. हा सिझन अनेक अर्थांनी जिओ सिनेमासाठी फायदेशीर ठरला आहे. गेल्या काही महिन्यापासून या ओटीटीवर मनोरंजनाचा रेलचेल सुरू असल्याचे पाहायला मिळते. अनेक नवे प्रोजेक्ट्स आता आकार घेत आहेत. दिवसेंदिवस जिओ सिनेमाची लोकप्रियता वाढताना दिसत असल्यामुळे एक समाधानाचे वातावरण आहे.