मुंबई- तारक मेहता का उल्टा चष्मा टीव्ही मालिकेची चर्चा नेहमी होत असते. मध्यंतरी या मालिकेतील अनेक कलाकार शो सोडून निघून गेले. अलिकडे याबाबत अशी चर्चा रंगत होती की मालिकेच्या निर्मात्यांनी कालाकारांचे पैसे बुडवले म्हणून कलाकार नाराज झाले आणि त्यांनी शो सोडला. अलिकडेच या शोमधील टप्पू राज अनादकटने शोला राम राम ठोकला होता. या कार्यक्रमातून बाहेर पडलेल्या शैलेश लेश लोंढा यांनीही हा शो पैसे न मिळाल्यामुळे सोडल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. या बातम्या झळकल्यानंतर तारक मेहता..शोचे निर्माता असित मोदी यांनी मौन सोडले आहे.
कलाकारांच्या मानधनाबद्दल असित मोदी यांचे मत - तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या शुटिंग सेटवर असित मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कलाकारांना मानधन मिळत नसल्याच्या मुद्द्यावर मोदी म्हणाले की, आमच्याकडून पैसे थकवण्यात आल्याची चर्चा कोणीही करत नाही, या सर्व अफवा आहेत. कलाकारांचे कष्टाचे पैसे आमच्या खिशात आम्ही कशाला ठेवू? इश्वराने मला भरपूर दिले आहे, सर्वाधिक प्रेम त्याने मला बहाल केले आहे. मी कलावंतांचे पैसे कशाला रोखू, मला लोकांना हसवण्याची संधी मिळते, यातच मला समाधान आहे.
मालिका सोडणाऱ्यांबद्दल काय म्हणाले असित मोदी? - ज्या कालाकारांनी तारक मेहता शो सोडला त्यांच्याबद्दल मोदी म्हणाले की, हा शो २००८ मध्ये सुरू झाला, आता त्याला १५ वर्षे पूर्ण होत आहेत. या शोमधील व्यक्तीरेखा त्याच आहेत, फक्त काही कलाकार बदलले आहेत. कलाकार का बदलले याच्या तपशीलात मला जायचे नाही, पण मी सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत आलो आहे. आमच्या मालिकेच्या सेटवर कलाकार कधीही भांडत नाहीत किंवा त्यांच्यात कोणताही वाद नाही. मी नेहमी इश्वराला प्रार्थना करतो की माझी ही टीम, मग तो स्पॉट बॉय असो मेकअप मॅन असो, ड्रेस मॅन असो, सर्वजण अबाधित राहो. या सर्वांचे 2008 पासून एक कुटुंब आहे आणि सर्वजण मन लावून एकत्र काम करत असतात.