पिंपरी चिंचवड ( पुणे ) - historic 100th drama festival : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे ऐतिहासिक नाट्य संमेलन ६ आणि ७ जानेवारी २०२४ असे दोन दिवस पिंपरी चिंचवड शहरामध्ये होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉ. जब्बार पटेल असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वागताध्यक्ष तर स्वागत समिती अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रमुख निमंत्रक म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत असतील अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राजेशकुमार साकला, राजेंद्र बंग, संतोष रासने, संतोष शिंदे, प्रणव जोशी, गौरी लोंढे, हर्षवर्धन भोईर, आकाश थिटे आणि नाट्य परिषदेचे सदस्य उपस्थित होते. भाऊसाहेब भोईर म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये शंभरावे नाट्य संमेलन होत आहे. ही अभिमानाची आणि शहराच्या दृष्टीने गौरवशाली बाब आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते ७९ व्या नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याचवेळी शंभरावे नाट्य संमेलन पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरात व्हावे ही अपेक्षा होती आणि त्याला स्वागत अध्यक्ष म्हणून पवार साहेब यांना बोलवावे अशी मनोमन इच्छा होती आणि योगायोगाने ही इच्छा पूर्ण होत आहे. २७ वर्षांच्या कालखंडात उदयोन्मुख कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्य संकुल उभे करता आले नाही, ही खंत आहे. मात्र नियोजित नाट्य संमेलनाच्या निमित्ताने ही उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. देणगी स्वरूपामध्ये आर्थिक मदत घेऊन शहरात सुसज्ज असे नाट्य संकुल उभे करण्याचा संकल्प पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचा आहे असेही भोईर यांनी सांगितले.
२७ वर्षांपूर्वी शहराची उद्योग नगरी अशी ओळख होती. स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी जाणीवपूर्वक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून पिंपरी चिंचवडला सांस्कृतिक शहर अशी ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले. म्हणूनच गेल्या २७ वर्षांत मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये वेळोवेळी आपले कलागुण सादर केले. याचा मनस्वी आनंद आहे. तसेच मराठी नाट्य चित्रपट सृष्टीत स्थानिक कलावंतांनी आपली ओळख निर्माण केली, याचा मनस्वी आनंद आहे, असे कृष्णकुमार गोयल म्हणाले.
नाट्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी नाट्य स्पर्धेत गाजलेल्या विविध नाटकांचे प्रयोग प्रायोगिक नाटके, नाट्यछटा एकपात्री प्रयोग एकांकिका कीर्तन, लोककला, महाराष्ट्रात गाजलेल्या विविध लावणी सम्राज्ञींचा लावणी महोत्सव, संगीत व नृत्य विषयक कार्यक्रम बालनाट्य व संबंध महाराष्ट्रातील स्पर्धांमध्ये नावाजलेल्या उल्लेखनीय एकांकिका व नाटकांचे प्रयोग होणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरांमधील आबाल वृद्ध रसिकांसाठी ही एक सांस्कृतिक पर्वणी आहे असे भोईर यांनी सांगितले.