मुंबई Ustad Rashid Khan Passes Away : प्रख्यात संगीतकार उस्ताद राशिद खान यांची दीर्घकाळ कर्करोगाशी सुरू असलेली झुंज संपली. राशिद खान यांचं मंगळवारी (9 जानेवारी) निधन झालंय. कोलकाता येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसापासून ते व्हेंटिलेटरवर होते.
रुग्णालयात सुरू होते उपचार : कोलकाता येथील खासगी रुग्णालयात उस्ताद राशिद खान यांच्यावर उपचार सुरू होते. आम्ही त्यांना वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण त्यांची प्राणज्योत मालवली, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी केला शोक व्यक्त : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उस्ताद राशिद खान यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केलाय. 'उस्ताद राशिद खान यांचं निधन ही देशाची हानी आहे. तसंच संगीतविश्वातही त्यांच्या निधनामुळं पोकळी निर्माण झालीय. मला अद्यापही विश्वास बसत नाही की उस्ताद राशिद खान आपल्यात नाहीत,' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
राशिद खान यांची लोकप्रिय गाणी : शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या 'जब वी मेट' या चित्रपटातील 'आओगे जब तुम' ही बंदिश उस्ताद राशिद खान यांनी गायली होती. ही बंदिश प्रचंड लोकप्रिय झाली होती. या बंदिशला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती. त्यानंतर 'माय नेम इज खान', 'राझ 3', 'मंटो' आणि 'शादी में जरूर आना' यांसारख्या चित्रपटांमधील गाणी देखील उस्ताद राशिद खान यांनी गायली आहेत. राशिद खान यांना पद्मश्रीसह संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मभूषणदेखील त्यांना प्रदान करण्यात आला होता.
हेही वाचा -
- शबाना आझमीसह दिग्गजांनी केले फरहान अख्तरच्या वाढदिवसाचे सेलेब्रिशन
- 'कल्की 2898 एडी' जगभरात 'या' दिवशी होणार प्रदर्शित
- चुंडी काऊंटर ते फुटबॉल सामना : आयरा खान नुपूरच्या लग्नाचा निराळा थाट माट