मुंबई - ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक प्रदीप दळवी लिखीत नाटक 90 च्या दशकापासून अनेक कारणांनी चर्चेत राहिलंय. गेल्या अनेक वर्षापासून या नाटकात शरद पोंक्षे नथूराम गोडसे ही व्यक्तीरेखा साकारत आहेत. महात्मा गांधी खटल्यात आरोपी ठरलेल्या नथूराम गोडसेच्या उदात्तीकरणाचा आरोप नाटकावर आणि शरद पोंक्षेवर नेहमी होत आलाय. या नाटकाची निर्मिती माऊली प्रॉडक्शन या नाट्य संस्थेनं केलीय. रंगमंचावर या नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती असली तरी सुरक्षेची काळजीही प्रशासनाला नेहमी घ्यावी लागते. दरम्यान माऊली प्रॉडक्शनपासून फारकत घेत शरद पोंक्षे यांनी हे नाटकं नव्या रुपात रंगमंचावर आणलं आहे. याला माऊली प्रॉडक्शनचे मालक व निर्माते उदय धुरत यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात खंडपीठांसमोर याबाबत याचिका दाखल केली होती.
शरद पोंक्षे यांनी मूळ नाटकाची नक्कल करुन रंगभूमीवर नवं नाटक आणल्याचा दावा याचिकेमध्ये निर्मात्यांनी केलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाला नाव बदलाच्या अर्जावर विचार करण्यासाठी निर्देश दिले आहेत. 19 ऑक्टोबर रोजी याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शरद पोक्षे आता 'नथुराम गोडसे बोलतोय'ऐवजी 'नथुराम गोडसे' असा नाटकाच्या नावात बदल करणार आहेत.
माऊली प्रोडक्शन द्वारे 1998 साली पहिल्यांदा 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्र राज्यात केले होते. त्यावेळी ठिक ठिकाणी या नाटकाला विरोध देखील झाला होता. 2016 ते 2019 सलग चार वर्षे शरद पोक्षे यांनी 'हे राम नथुराम'या नाटकाचे प्रयोग केले होते. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात हे प्रयोग झाले होते. काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी समर्थन मिळाले होते. 15 ऑगस्ट 2023 रोजी अभिनेता शरद पोंक्षे यांनी सार्वजनिकपणे घोषित केले की, पुन्हा ते नाटक महाराष्ट्रातील विविध शहरातील नाट्यगृहात करणार आहे. तेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं की 'हे राम' ऐवजी 'मी नथुराम गोडसे बोलतोय या नावानं ते नाटक सादर करतील.