मुंबई- Major attractions on OTT in December 2023: 2023 च्या अखेरच्या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रवाहित होणार आहेत. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना भरपूर मनोरंजनासह डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये झोया अख्तर दिग्दर्शित आणि स्टार किड्सचे पदार्पण असलेला द आर्चीज, अक्षय कुमार स्टारर मिशन राणीगंज, पंकज त्रिपाठीची मुख्य भूमिका असलेला कडक सिंग, म्युझिकल थ्रिलर चमक, द क्राउन सीझन 6 चा दुसरा भाग अशी खास आकर्षणं आहेत. दिग्दर्शिका झोया अख्तरकडे 'खो गए हम कहाँ'च्या रूपानं डिसेंबरमध्ये रिलीज होणारा आणखी एक प्रोजेक्ट असणार आहे. ही तीन मित्रांची डिजिटल-कहाणी आहे.
अक्षय कुमार स्टारर मिशन राणीगंज
नेटफ्लिक्सवर 1 डिसेंबरपासून
अलिकडेच उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या 41 मजूरांची सुखरुप सुटका करण्यात बचाव पथकाला मोठं यश आलं होतं. अशाच प्रकारची घटना 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे घडली होती. यावर अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला मिशन राणीगंज हा चित्रपट बनला आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रवाहित झाला आहे. या चित्रपटाचं प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी भरपूर कौतुक केलंय.
नागा चैतन्य स्टारर 'धूथा' वेब सिरीज
अॅमेझॉन प्राईमवर 1 डिसेंबरपासून
साऊथ अभिनेता नागा चैतन्य यानं 'धूथा' या वेब सीरिजमधून डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलंय. 1 डिसेंबर रोजी त्याची 'धूथा' ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे. सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज करताना नागानं त्याच्या पोस्टमध्ये लिहलं होतं, 'खूप रहस्ये आणि सत्याच्या शोधात एक माणूस'. या वेब सीरिजचा ट्रेलर खूप दमदार आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आठ भागांच्या या वेब सीरिजमध्ये पार्वती थिरुवोथू, प्रिया भवानी शंकर आणि प्राची देसाई यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज'
नेटफ्लिक्सवर 7 डिसेंबर पासून
झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीज हा म्यूझिकल चित्रपट नेटफ्लिक्सवर 7 डिसेंबर रोजी प्रवाहित होणार आहे. 'द आर्चीज' हा एक नव्या युगाचे संगीत असलेला आर्ची, बेट्टी, वेरोनिका, जुगहेड, रेगी, एथेल आणि डिल्टन यांच्या आयुष्यातील एक काव्यमय कथा असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा रिव्हरडेल या काल्पनिक डोंगराळ शहरात घडताना प्रेक्षक पाहणार आहेत. या चित्रपटातून प्रेम, मैत्री, स्वातंत्र्य आणि बंडखोरी याचा शोध चित्रपटात घेतला जाणार आहे.
जगभरात गाजलेल्या लोकप्रिय कॉमिक्सच्या भारतीय रूपांतरात आर्ची अँड्र्यूजच्या भूमिकेत अगस्त्य नंदा, बेटी कूपरच्या भूमिकेत खुशी कपूर, नेहमी भुकेल्या जुगहेड जोन्सच्या भूमिकेत मिहिर आहुजा, सुहाना खान वेरोनिका लॉजच्या भूमिकेत आणि युवराज मेंडा डिल्टन डोईलीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
म्यूझिकल थ्रिलर 'चमक'
सोनी LIV 7 डिसेंबरपासून
'चमक' ही म्युझिकल थ्रिलर असलेली मालिका एका तरुण रॅपर कालाभोवती गुंफण्यात आली आहे. कॅनडातून एक युवक पंजाबला येतो आणि एका दिग्गज गायकाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पंजाबी संगीत उद्योगात पाऊल ठेवतो, असं याचं कथानक आहे. त्याच्या या मार्गात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना तो कसा करतो हे पाहणं रंजक असणार आहे. परमवीर सिंग चीमा, मनोज पाहवा, मोहित मलिक, ईशा तलवार, मुकेश छाबरा, प्रिन्स कंवलजीत सिंग, सुविंदर (विकी) पाल आणि आकासा सिंग यांच्या या वेब सिरीजमध्ये भूमिका आहेत.
पंकज त्रिपाठी स्टारर कडक सिंग
ZEE5 वर 8 डिसेंबरपासून
अभिनेता पंकज त्रिपाठीची मुख्य भूमिका असलेला कडक सिंग हा चित्रपट झी 5 वर 8 डिसेंबरपासून प्रवाहित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन पिंक अँड लॉस्ट फेमचे अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केले आहे. यात पंकज त्रिपाठी पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसेल. 'कडक सिंग' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची कहाणी खूप रहस्यमय असेल. गोव्यात झालेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'कडक सिंग' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. यात पार्वती तिरुवोथु आणि संजना संघी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
क्राउन सीझन 6 भाग 2
नेटफ्लिक्स 14 डिसेंबर रोजी
राणी एलिझाबेथ II च्या जीवनावर आणि कारकिर्दीवर आधारित द क्राउनचा सहावा आणि शेवटचा सीझन नेटफ्लिक्सवर दोन भागमध्ये प्रदर्शित होत आहे. चार एपिसोौड्सचा पहिला भाग 16 नोव्हेंबर 2023 रोजी रिलीज झाला होता. आता प्रवाहित होणारा दुसऱ्या भागात सहा एपिसोड्स आहेत. 14 डिसेंबर रोजी प्रवाहित होणारा हा अंतिम हंगाम 8 सप्टेंबर 2022 रोजी राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर तयार करण्यात आला आहे. राणी एलिझाबेथ II च्या 1947 मधील लग्नापासून ते 21 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतच्या कारकिर्दीचे वर्णन क्राउनमध्ये पाहायला मिळते. या मालिकेत प्रिन्स फिलिपच्या भूमिकेत जोनाथन प्राइस, राजकुमारी मार्गारेटच्या भूमिकेत लेस्ली मॅनव्हिल, प्रिन्स चार्ल्सच्या भूमिकेत डोमिनिक वेस्ट, प्रिंसेस ऍनीच्या भूमिकेत क्लॉडिया हॅरिसन, टोनी ब्लेअरच्या भूमिकेत बर्टी कार्वेल, मोहम्मद अल फैद यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.