महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बिग बॉस मराठीमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली, शिव्यावर कंट्रोल ठेवण्याचा मानेंचा संकल्प - बिग बॉस मराठी १६ स्पर्धक

नुकत्याच पार पडलेल्या ग्रँड प्रिमियरमध्ये बिग बॉस मराठीच्या १६ स्पर्धकांची नावे जाहीर झाली यात किरण माने, अपूर्वा नेमळेकर, अमृता घोंगडे, प्रसाद जवादे, तेजस्विनी लोणारी यांसारख्या अनेक हरहुन्नरी मराठी कलाकारांचा समावेश आहे. किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित जशास तसे वागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या सिझनमध्ये किरण माने वादळी ठरु शकतो, असा अंदाज आहे.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनला २ ऑक्टोबरपासून सुरुवात
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनला २ ऑक्टोबरपासून सुरुवात

By

Published : Oct 3, 2022, 3:27 PM IST

मुंबई - बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनला २ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. आता पुढचे १०० दिवस हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या शोचे होस्ट महेश मांजरेकर स्पर्धकांना सांभाळून घेणार आहे तर गरज पडल्यास त्यांना दमही देणार आहेत. यंदाच्या सीझनमध्ये घरात पहिलं पाऊल ठेवण्याची संधी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिला प्राप्त झाली आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनची थीम 'ऑल इज वेल'वर आधारित आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रँड प्रिमियरमध्ये बिग बॉसच्या १६ स्पर्धकांची नावे जाहीर झाली यात तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, निखील राजेशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशश्री मसुरकर, विकास सावंत, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, डॉ रोहित शिंदे यांसारख्या हरहुन्नरी मराठी कलाकारांचा समावेश आहे.

बिग बॉसमध्ये राडा होण्याची पंरपार नवीन नाही. यात प्रत्येकजण आपल्या उपद्रव्यमूल्य दाखवत असतो. याची सुरुवात पहिल्याच दिवशी झाली आहे. स्पर्धक प्रसाद जवादे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्या वादाची पहिली ठिगणी पडल्याचे दिसत आहे.

मराठी टीव्ही अभिनेता किरण माने याची बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात धमाकेदार एंट्री घेतली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे. त्यांनी आपल्या सातारी भाषेत लिहिलंय, ''...माझा इस्वास हाय तुमी माझी साथ सोडनार नाय ! मानूस हाय मी, माणसासारखा वागनार तिथं. मनापास्नं. कुठलंच ढोंग नाय करनार. खेळ हाय त्यो. स्विकारलाय तर जीव लावून खेळनार. ढिला पडनार नाय. हसनार, हसवनार, चिडनार, चिडवनार, भांडनार, वाद घालनार, मैत्री केलीच तर 'दिल से' करनार...ती निभावनार. एखाद्यानं पंगा घेतला तर त्याला त्याची जागा दाखवायला कमी नाय पडनार.

...गावाकडचा गडी हाय. शेतकरी कुटूंबातला. रानात फिरलेला, ढेकळं तुडवलेला. नदीत,विहिरीत पोहलेला. एका गोष्टीवर कंट्रोल ठेवायचा जिवापाड प्रयत्न करावा लागनारंय दोस्तांनो. 'शिवी' ! 'शिवी' हा आमच्या बोलीतला अविभाज्य भाग हाय. त्या शिव्यांचा अर्थ नस्तो डोक्यात. एक एक्सप्रेशन म्हनून ती बाहेर येती एवढंच. आवो आमी तर लै छोटी मान्सं, आमच्या पहाडासारख्या तुकोबारायाच्या अभंगातबी तुमाला शिव्या सापडत्याल. निव्वळ मनातली भडास व्यक्त करन्याचं साधन म्हनून शिवी येती तोंडात. पन त्याचा तिथं 'इश्यू' हुईल.. माझ्याविरूद्ध शस्त्र म्हनून वापर हुईल, हे म्हायतीय मला. कारन मी बी लै शिवराळ हाय. भांडताना मला त्या सवयीवर लगाम घालायला लागनार... ते करीन.

...माझ्या भावांनो आनि बहिनींनो, मी तुमचं मनोरंजन करन्यात कनभरबी कमी पडनार नाय. माझ्याकडनं चुका झाल्या तर त्या पोटात घ्याल तुमी हे बी म्हायतीय मला.

मला एक महत्त्वाचं सांगावंसं वाटतंय. मी तुकोबारायांवर कायम लिहीत असतो. तुकोबा माझ्या श्वासात हाय. मी गौतम बुद्धांवर व्याख्यान देतो. छ. शिवराय, छ. शंभूराजे यांच्यावर व्याख्यानं देतो. महाराष्ट्रातल्या गांवोगांवी जाऊन महात्मा फुले, लोकराजा शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करतो. या सगळ्या महामानवांचे विचार माझ्या रक्तात हायेत. पन एक लक्षात ठेवा, सामान्य मानूस ज्या चुका करतो, त्या माझ्याकडनं बी होत्यात. मी आदर्श असल्याचा मुखवटा घालून नाय खेळनार. अभिनेता, सेलिब्रिटी म्हनून 'बिग बॉस'सारख्या शो मध्ये जाताना मी केवळ एक त्या शो चा खेळाडू म्हनून खेळीन. "बाहेर व्याख्यानांत महामानवांवर बोलतो आनि शो मध्ये बघा कसा भांडतोय." असा गोंधळ करून घेऊ नका. मी बिग बाॅसच्या घरात केवळ या शो च्या 'फॉरमॅट'चं पालन करून खेळनारा एक खेळाडू असेन. खेळाडू, एक अभिनेता म्हनूनच माझ्याकडं बघा आनि शो चा आनंद घ्या.'' असं किरण माने यांनी सोशल मीडियावरील आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

बिग बॉस मराठी ४ चे १६ स्पर्धक - तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, निखील राजेशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशश्री मसुरकर, विकास सावंत, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, डॉ रोहित शिंदे,

हेही वाचा -Bigg Boss 16: अंकित प्रियांका बाँडमुळे उत्सुक वाढली, टीना दत्ताला करायचंय अब्दू रोजिकला डेट

ABOUT THE AUTHOR

...view details