मुंबई- 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहराने त्याची पत्नी, अभिनेत्री निशा रावल हिच्यावर रोहित साथियासोबत अफेअर असल्याचा आरोप केला आहे. रोहित हा आपला मानलेला भाऊ असल्याची ओळख तिने करणला करुन दिली होती. निशा रोहितसोबत त्याच्या घरी राहत असल्याचे अभिनेत्याने म्हटले आहे. माझ्याकडे पुरावे नसल्याने तो गप्प बसल्याचेही करणने म्हटले आहे.
जून 2021 मध्ये करण मेहरावर त्याच्या पत्नीने प्रेमसंबंध ठेवल्याचा, तिचे दागिने घेतल्याचा आणि तिला मारहाण केल्याचा आरोप केला होता. घरगुती वादावरुन निशाच्या तक्रारीनंतर करण मेहराला अटक झाल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला. आता, करणने आरोप केला आहे की निशाचे एका पुरुषासोबत अफेअर होते ज्याने त्यांच्या लग्नात तिचे कन्यादान केले होते.
निशाचे तिच्या 'मानलेल्या भावा'सोबत 14 वर्षांचे अफेअर असल्याचा आरोप करत करणने एका पत्रकार परिषदेत सांगितले की, "निशा माझ्या घरी दुसर्या पुरुषासोबत राहते, आम्ही न्यायालयात पुरावे सादर केले आहेत आणि म्हणूनच मी आज येथे बोलत आहे. निशा रावलचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, तिचे विवाहबाह्य संबंध आहेत. रोहित साथिया हा तिचा १४ वर्षांचा 'मानलेला भाऊ' आहे, ज्याने तिचे 'कन्यादान' देखील केले होते. तेव्हा माझ्याकडे पुरावा नव्हता , म्हणूनच मी काही बोललो नाही."
एका वेबलॉइडशी बोलताना करणने असेही सांगितले की, तो निशा आणि रोहितसोबत राहणाऱ्या आपल्या मुलाच्या ताब्यासाठी लढत आहे. "माझ्या मुलाकडे मला प्रवेश नाही. रोहितच्या मुलीने कविशला राखी बांधली. हे सगळ्यांना (नातेवाईकांना) माहीत आहे आणि ही दोन मुलं यात सामील आहेत, त्यांना आम्ही काय सांगणार? मी सत्यासाठी लढतोय, मी त्यासाठी लढणार आहे," असंही करण मेहरा म्हणाला.