मुंबई - ITA Awards 2023: टेलिव्हिजन व्यवसायातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा २३वा इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्स (ITA) सोहळा रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यामध्ये दिग्गज सेलेब्रिटींनी रेड कार्पेटवर हजेरी लावली. स्मृती इराणी, हृतिक रोशन, राणी मुखर्जी आणि इतर सेलिब्रिटी इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार 2023 मध्ये उपस्थित होते.
रविवार 10 डिसेंबर रोजी मुंबईने इंडियन टेलिव्हिजन अकादमी अवॉर्ड्सचे आयोजन केलं होतं, या पुरस्कार सोहळ्याला ITA अवॉर्ड्स नाईट म्हणूनही ओळखले जाते. या कार्यक्रमाला बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील दिग्गजांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. भारताच्या महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी या पुरस्कार सोहळ्याला सन्माननीय पाहुण्या म्हणून हजर होत्या.
ITA 2023 रेड कार्पेटवर हृतिक रोशन आणि त्याचे वडील राकेश रोशन एकत्र चालताना दिसले. ही पिता-पुत्राची जोडी काळ्या रंगाच्या मॅचिंग कपड्यात अवतरली होती. या रंगीत संध्याकाळी राणी मुखर्जीनंही काळ्या रंगाचा गाऊन घातला होता. ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र यांनीही आयटीए पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. शिवाय, भूमी पेडणेकर, शोभिता धुलिपाला, रोहित शेट्टी आणि इतर अनेकांनी देखील कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला.
हिट टेलिव्हिजन मालिका आणि शोमध्ये अनेक सेलेब्रिटी वेगवेगळ्या श्रेणीमध्ये नामांकित करण्यात आले होते. यामध्ये कोण जिंकणार याबद्दलची चुरस प्रेक्षकांमध्येही होती. यामध्ये हर्षद चोप्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी लोकप्रिय श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीच्या ट्रॉफी जिंकल्या. त्यांच्या या मोठ्या यशानंतर या कार्यक्रमातील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.