मुंबई - Himanshi and Aseem Riaz break up : बिग बॉसच्या घरात जमलेल्या जोड्या घराबाहेर पडल्यानंतरही टिकतात अशी खूप कमी जोडपी आहेत. त्यामध्ये पंजाबी गायिका हिमांशी खुराणा आणि असीम रियाझ हे एक जोडपं होतं. दोघांची जोडी बिग बॉसच्या घरात असताना जमली. याचा आनंद त्यांच्या चाहत्यांनाही झाला. दोघे लग्न कधी करणार याची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांना मात्र एका नव्या बातमीनं धक्का बसला आहे. हिमांशी खुराणा आणि असीम रियाझ यांचा संसार मांडण्या आधीच विस्कटला आहे. हिमांशी खुराणाने स्वत: सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली आहे.
वेगवेगळ्या धर्मामुळे झाले ब्रेकअप
पंजाबी गायिका हिमांशी खुराणाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय, "होय, यापुढे आम्ही एकत्र राहणार नाही आहोत, आम्ही जो काळ एकत्र घालवला तो ग्रेट होता पण आता हे सर्व संपुष्टात आले आहे. आमच्या नात्याचा प्रवास ग्रेट होता आणि आता यापुढे आम्ही आमचे जगणे सुरू ठेवणार आहोत. आपआपल्या धर्माचा आदर राखत आम्ही प्रेमाचं बलिदान वेगळ्या धार्मिक कारणासाठी करत आहोत. आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही. कृपया आमच्या खासगीपणाचा आदर करा..... हिमांशी."
अशी जमली होती जोडी
हिमांशी आणि असीम रियाजच्या ब्रेकअपच्या बातम्या गेल्या महिन्याभरापासून येणं सुरू झालं होतं. असीम रियाझनं गायिका हिमांशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्यानं या चर्चांना उधाण आलं होतं. हिमांशी आणि असीम हे जोडपे राहिले नसल्याचं अखेर अशा प्रकारे समोर आलं आहे. त्यांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचं तर हिमांशी आणि असीम 'बिग बॉस 13' च्या घरात पहिल्यांदा भेटले होते आणि दोघेही प्रेमात पडले होते. हिमांशीने तिच्या नऊ वर्षांच्या प्रियकराशी असीमसाठी ब्रेकअप केलं होतं. हिमांशी आणि असीम अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये एकत्र दिसले आहेत.