मुंबई- ऑगस्ट महिन्यात रिलीज होणारे चित्रपट आणि ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या वेब सिरीज, शो आणि चित्रपट यामुळे हा महिना धमाल मनोरंजनाचा ठरणार आहे. या महिन्यात 'गदर २' आणि 'ओ माय गॉड'सारखे दोन मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. तसेच दोन मोठ्या वेब सिरीजचेही प्रसारण सुरू होईल. त्यामुळे या सर्व चित्रपट आणि वेब सिरीजच्या संपूर्ण यादीवरुन एक नजर जरुर टाका.
ओ माय गॉड 2 -अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्या भूमिका असलेल्या 'ओ माय गॉड २' चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक आतुरतेने करत आहेत. अमित रॉय दिग्दर्शत हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.
गदर 2 -सनी देओलच्या 'गदर' या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वेल २२ वर्षानंतर येत आहे. 'गदर २' मधून सनी देओल आणि आमिषा पटेलची जोडी पुन्हा एकत्र येईल. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'ओ माय गॉड' चित्रपटाशी टक्कर होणार आहे.
ताली - अभिनेत्री सुष्मिता सेन आगामी 'ताली' चित्रपटात ट्रान्स जेंडर कार्यकर्ती श्रीगौरी सावंतची भूमिका साकारत आहे. पहिल्यांदाच ती अशी व्यक्तीरेखा साकारणार आहे. हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटीवर १५ ऑगस्टपासून मोफत पाहाता येणार आहे.
ड्रीम गर्ल 2 -कॉमेडी चित्रपट 'ड्रीम गर्ल-2' हा ऑगस्ट महिन्यातील मोठे मनोरंजक आकर्षण असणार आहे. आयुष्मान खुरान आणि अनन्या पांडे यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी रिलीज होईल. बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट राज शांडिल्य यांनी बनवला आहे. 'ड्रीम गर्ल'च्या या सीक्वेल चित्रपटात आयुष्मान खुराना, विजय राज, अन्नु कपूर यांच्यासह परेश रावल आणि राजपाल यादव यांच्याही भूमिका असतील.
चूना - 'चूना' ही हिंदी वेब सिरीज ३ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. हा एक क्राइम पोलिटीकल ड्रामा आहे. जिमी शेरगिल, मोनिका पनवर, विक्रम कोच्चर. चंदन रॉय आणि नमित दास यांच्या या मालिकेत भूमिका आहेत. आठ भाग असलेली ही मालिका पुष्पेंद्र नाथ मिश्री यांनी लिहिली आणि बनवली आहे.